महापालिकेने हिंमत दाखवली, गोवंडीतील कलेक्टरच्या जागेवरील १५० झोपड्या तोडल्या

गोवंडीतील या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात व ‘घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड’ नजिक असणा-या जिल्हाधिकाऱ्यांच्या (कलेक्टर) जागेवरील सुमारे २ एकराच्या भूखंडावर मागील वर्षभरात उभ्या राहिलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने कारवाई करत तब्बल यावरील १५० झोपड्या जमिनदोस्त केल्या.

( हेही वाचा : तीन महिन्यांत इतकी रजा घेतली तर ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार फिटनेस सर्टिफिकेट! )

१५० झोपड्या जमिनदोस्त

गोवंडीतील या २ एकर आकाराच्या भूखंडावर निर्माण झालेल्या सुमारे १५० अतिक्रमणे हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे ३५ कामगार – कर्मचारी – अधिकारी कार्यरत होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस दलाचे १५ कर्मचारीही त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात होते. त्याचबरोबर ही कारवाई करण्यासाठी २ जेसीबी, २ डंपर यासह इतर आवश्यक यंत्रसामुग्री व साधने वापरण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता सुरु झालेली ही कारवाई सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुरु होती.

अतिक्रमणे हटवली 

महानगरपालिकेच्या ‘परिमंडळ – ५’ चे उप आयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनात ‘एम पूर्व’ विभागाच्या पुढाकाराने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व मुंबई पोलीस दलाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान ही अतिक्रमणे गुरुवारी हटविण्यात आली असल्याची माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील या भूखंडावर पुन्हा अतिक्रमणे होवू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला या मोकळ्या झालेल्या जागेवर संरक्षक भिंत तथा कुंपण घालण्याचे सुचविण्यात आले असल्याची माहिती महेंद्र उबाळे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here