मुंबईत मागील १८ दिवसांमध्ये डेंग्यूचे तब्बल १३९ नवीन रुग्ण आढळून आल्याने एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ज्या भागांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत त्याठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांचा शोध किटक नाशक विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या रडारवर आता महापालिकेची रुग्णालये आली आहे. त्यामुळे वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांमध्ये तसेच प्रसुतीगृहांमध्ये आणि आसपासच्या परिसरांमध्ये किटकनाशक विभागाच्यावतीने साचलेल्या पाण्याचा शोध घेऊन त्यात औषध फवारणी आणि धूर फवारणी करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.
मुंबई मागील काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसीसच्या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत सप्टेंबर महिन्याच्या १८ तारखेपर्यंत मलेरियाचे ३९८ आणि डेंग्यूचे १३६ नवीन रुग्ण आढळून आले. तर अतिसार अर्थात गॅस्ट्रोचे २०८ नवीन रुग्ण आढळून आहे. जानेवारीपासून ते १८ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे २९९० आणि डेंग्यूचे ४९२ एवढी रुग्ण संख्या झाली असून मलेरियाचा एक तर डेंग्यूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाच्या संततधारामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याने या आजाराचे रुग्ण आता महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे या डेंग्यूच्या रुग्णांना चावलेला डास अन्य डॉक्टर, नर्स किंवा अन्य रुग्णालयीय कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना चावल्यास या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक सुरक्षेचा उपाय म्हणून अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सर्व रुग्णालयांमध्ये तसेच त्यांच्या आवारांमध्ये साचलेल्या पाण्याचा शोध घेऊन त्याठिकाणच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे तसेच त्याठिकाणी औषध फवारणी करणे आणि धूर फवारणी करणे आदी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहे. पुढील १५ दिवस ही मोहिम सर्व रुग्णालयांमध्ये राबवली जाणार आहे.
महापालिकेच्या किटक नाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी याबाबत सांगताना, प्रत्येक रुग्णालयांमध्ये दर १५ दिवसांनी डेंग्यूच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आतील आणि बाहेरील परिसराची पाहणी करून पाणी तुंबणा-या भंगार सामानांसह सर्वांची विल्हेवाट लावणे, तसेच औषधांसह धूम्र फवारणी करण्याचा कार्यक्रम राबवला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याने येथील डॉक्टर आणि नर्ससह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरता विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून पुढील काही दिवस ही मोहिम प्रत्येक रुग्णालयांमध्ये राबवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: पत्राचाळ प्रकरणात राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार; स्वप्ना पाटकरांनी केले ‘हे’ गंभीर आरोप )
दरम्यान, डेंग्यूच्या आजाराने आता रुग्णांलयांनाही विळखा घातला असून नायर रुग्णालयातील सहा शिकाऊ डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याचे बोलले जात आहे. नायरसह केईएम रुग्णालयातीलही डॉक्टरांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचीही चर्चा आहे. मंगळवारी किटक नाशक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या पाहणीत काही ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडून आल्या असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कॉलेज इमारतीत या अळ्या सापडल्या असून तिथेच डेंग्यूची लागण झाली असावी असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community