प्लास्टिक पिशव्यांविरोधात महापालिकेच्यावतीने कारवाई केल्यानंतर जप्त केलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट आता प्लास्टिक उत्पादन कंपन्यांना विकूनच केली जात आहे. महापालिकेकडून आतापर्यंत ९६ हजार ८२४ किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले असून यातून महापालिकेने तब्बल दहा लाख रुपयांची कमाई केली आहे.
विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढून हे प्लास्टिक विकले जाते
राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलयानंतर मार्च २०१८पासून मुंबईत कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभाग, बाजार विभाग आणि परवाना विभाग आदींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त करून महापालिकेच्या गोदामात जमा केला जातो. त्यामुळे या प्लास्टिकचे विघटन करण्यादृष्टीकोनातून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या यादीतील कंत्राटदार तथा व्यावसायिक यांना प्लास्टिक साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा काढून हे प्लास्टिक विकले जाते.
सुरुवातीच्या काळात परवाना विभागाकडे १५ हजार ८११० किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. परंतु पुढे या प्लास्टिकचा साठा वाढत जावून सुमारे ९७ हजार किलोग्रॅम जमा झाले होते. दहा रुपये किलोग्रॅम दराने या प्लास्टिकची विक्री करण्यात येत असून यातून सुमारे दहा लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : ‘तारीख ठरली’ राज्यात १५ हजार जागांसाठी पोलीस भरती!)
महापालिकेने जप्त केलेले प्लास्टिक जर पुन्हा प्लास्टिक व्यावसायिक आणि ठेकेदारांना विकल्यास त्या पिशव्या पुन्हा विक्रीला येवू शकतात. त्यामुळे दंडात्मक कारवाईचा हेतूच स्पष्ट होत नसल्याची नागरिकांची भावना आहे.
महापालिकेच्या परवाना विभागाचे अधिक्षक शरद बांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जप्त केलेल्या प्लास्टिकचा साठा महापालिकेच्यावतीने केला जातो. या साठा केलेल्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी प्रदुषण मंडळाच्या सूचीवरील कंत्राटदारांना निविदा पध्दतीने विक्री केला जातो. या प्लास्टिकची पुनर्विक्री न करण्याच्या अटीवरच हा साठा विकला जात असून या विकलेल्या प्लास्टिकचे विघटन करून त्याचा पुनर्वापर प्रदुषण मंडळाच्या निकषानुसार केले जाते,असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community