गुजरात्यांना दुषणे देऊन पालिकेची निवडणूक जिंकता येईल का?

उठा उठा मुंबईची निवडणूक आली, परप्रांतियांना दूषणे द्यायची वेळ झाली. महाराष्ट्रात काही पक्ष असे आहेत जे निवडणूक जिंकण्यापुरते मराठी होतात. इतर वेळी त्यांना मराठी आठवत नाही. आता वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन नवा वाद रंगला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातने बळकावला, नरेंद्र मोदींनी हा प्रकल्प मुद्दामून मुंबईपासून हिरावून घेतला, असे आरोप होत आहेत.

(हेही वाचा- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता: धरिला कॉंग्रेसचा बापू…)

जणू काही गुजरात हा भारताचा भाग नसून पाकिस्थानचा भाग आहे. अनेक वर्षांपासून या गोष्टी महाराष्ट्रात सुरु आहेत. मराठीच्या नावाने राजकारण करुन बंगले बांधणारे गुजराती व इतर अमराठी लोकांविरोधात मराठी माणसाला भडकवत आहेत. कारण मराठी माणसाच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष निर्माण करायचा आहे. या कारणामुळे मुंबईतील मराठी माणूस मागे पडला आहे. होय! जर असा आरोप होत असेल की, मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होतोय किंवा हा मुंबई तोडण्याचा डाव आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा मुंबई तोडणारे गुजराती मारवाडी नसून मराठीच्या मुद्द्यावरुन राजकारण करणारे आपलेच नेते आहेत.

या मराठी कैवार्‍यांसमोर अनधिकृत झोपड्या निर्माण होत होत्या, तेव्हा या झोपड्यांवर बंदी घालता नसती का आली? परप्रांतीयांमुळे मराठी माणसाला नोकरी मिळत नाही असं म्हणता मग मराठी माणसाला नोकर्‍या मिळाव्यात यासाठी प्रयत्न नसते का करता आले? अनधिकृत झोपड्या तयार नसत्या झाल्या तर अमराठी लोकांची लोकसंख्या वाढली असती का? मालवणीमध्ये वाढलेली झोपडपट्ती ही केवळ अमराठी लोकांची नसून तिथे अवैध धंदे चालतात अशी बातमी होती. मग हे अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात? यावर कारवाई नसती का करता आली?

असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावरुन हे लक्षात येतं की मराठी माणूस सतत न्यूनगंडाच्या छायेखाली रहावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कारण घाबरलेला मराठी माणूस ह्यांचा मतदार आहे. आम्ही तुमचे वाली आहोत, अशी भिती मराठी माणसाका कित्येक वर्षे दाखवली जात आहे. पण आता जुना जमाना राहिलेला नाही. मराठी माणूस भुलथापांना बळी पडणार नाही. अमराठी लोकांना दूषणे देऊन निवडणूक जिंकण्याचे दिवस गेले. हा आधुनिक मराठी माणूस आहे, तो विकासाला मत देतो…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here