डांबरी रस्ते, खड्डयास काळ

104

नेमेची येतो पावसाळा, तसे नेमेची रस्त्यावर येतात खड्डे… मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डयांची तोंडे उघडी पडली असून या खड्डयांमध्ये हजारो कोल्डिमिक्स टाकूनही ते टिकत नाही. आतापर्यंत या खड्डयांनी तीन हजार मेट्रीक टनांपेक्षा अधिक कोल्डमिक्स स्वाहा केले असून हे सर्व खड्डे डांबरी रस्त्यांवरच पडलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या उक्तीप्रमाणे आता डांबरी रस्ते हे खड्डयास काळ असे म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

डांबरी रस्त्यांवर खड्डे

मुंबईत यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२ हजार ६९५ चौरस मीटर इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत महानगरपालिकेने सुमारे १० हजार १९९ खड्डे बुजवले होते, म्हणजेच यंदा खड्ड्यांच्या समस्येत घट झाली आहे,असा दावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केला. महापालिकेच्या हद्दीतील खड्डे हे महापालिका बुजवत असले तरी अन्य प्राधिकरणांच्या हद्दीतील खड्डे बुजवण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांवर असते. त्यामुळे महापालिका आपल्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे बुजवत असली तरी इतर प्राधिकरणांच्या हद्दीमधील खड्डयांमुळे महापालिकाच टिकेचे धनी होताना दिसत आहे.

मुंबईत सुमारे २ हजार ०५५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी १,२५५ किलोमीटर डांबरी तर ८०० किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे, ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात,असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेने यासाठी सोशल मिडियावर तसेच हेल्पलाईनवर खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ४८ तासांमध्ये प्रत्येक खड्डा बुजवला जात नाही. ज्या खड्डयांची तक्रार नाही तो खड्डा तसाच रस्त्यावर राहिला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही डांबरी रस्त्यांवरच खड्डयांचे प्रमाण अधिक असून तक्रार केल्यानंतरही ४८तासांमध्ये खड्डे बुजवले जात नाही. मुंबईतील दादर, शिवाजीपार्क, महालक्ष्मी, माटुंगा, खार, सांताक्रुझ पूर्व व पश्चिम, अंधेरी, जोगेश्वरी, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, शिवडी, परळ, वडाळा आदी भागांमध्ये डांबरी रस्त्यांवर खड्डे पहायला मिळत आहे.

खड्डयांमुळे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण

खार पश्चिम येथील भाजपच्या माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी कोल्डमिक्सच योग्य दर्जाचे नसल्याची शंका उपस्थित केली आहे. जुने खार, गोविंद पाटील मार्ग, आंबेडकर रोड, हिल रोड आदी भागांमध्ये खड्डेच दिसून येत असून तक्रारीनंतरही ते बुजवले गेले नव्हते. खड्डे बुजवण्यासाठी आता कोल्डमिक्स वापरण्यापूर्वी दगडविटांचा भराव केला केला जातो आणि त्यानंतर त्यावर कोल्डमिक्सचा वापर केला जातो. परंतु हे कोल्डमिक्स पावसाळ्यात वाहून जात आजूबाजूला खडी पसरुन दुचाकी वाहन चालकांसाठी धोक्याची ठरत आहे, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.

मानखुर्दमधील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनीही खड्डयांबाबत तीव नाराजी व्यक्त केली. या भागातील डम्पिंग रोड व रोड क्रमांक १० वर मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत, परंतु ते खड्डे बुजवलेच जात नाही. डम्पिंग रोडवरुन कचऱ्या गाड्यांची वाहतूक होत असते, त्यामुळे या खड्डयांमुळे इथे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल सिद्दीकी यांनी केला आहे.

वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनीही खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महालक्ष्मी येथील केशवखाडे मार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे निर्माण झाले असून मागील आठ दिवसांपासून हे खड्डे जैसे थेच आहे. मात्र, कोल्डमिक्सचाही प्रभाव खड्डयांमध्ये दिसून येत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.