व्यापारी संघटनांपुढे महानगरपालिका प्रशासन झुकले; दुकानांच्या पाट्या मराठीतून करण्यास आणखी महिन्याभराची मुदत!

144

मुंबई महापालिका प्रशासन आणखी एका धनशक्ती पुढे झुकले. यापूर्वी विकासक, हॉटेल व्यावसायिक, जाहिरातदार कंपन्या आदींना कर आणि प्रीमियममध्ये सवलत देत त्यांच्यापुढे लोटांगण घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता दुकानांचे व्यापारी यांच्यासमोर मान झुकवली. दुकानांच्या पाट्या मराठीतून न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने मुंबईतील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला केलेल्या विनंतीचा विचार करुन ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

( हेही वाचा : आता हाॅटेल्सना ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेता येणार नाही; केंद्र सरकार आखणार नियम )

कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता

मुंबईतील मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता दिनांक ३० जून २०२२ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. जर ३१ मे पर्यत या पाट्या मराठीतून न केल्यास पुढील १५ दिवसांत सर्व्हे करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, दिनांक १७ मार्च २०२२’ अन्वये ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अधिनियमाचे कलम ३६ क (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असला पाहिजे. याबाबतची अधिसूचना एप्रिल महिन्यात प्रसिद्ध करून महापालिकांना याबाबतचे निर्देश दिले होते. त्यामुळे पहिल्या दीड महिन्यात अर्थात दिलेल्या मुदतीत महापालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाला दुकानांच्या पाट्या मराठीत करून घेता आल्या नाहीत.

अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मात्र, मराठी भाषेतील अक्षरलेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font Size), इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असता कामा नये, म्हणजेच मराठी टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेपेक्षा मोठ्या आकारात असणे आवश्यक आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन

अधिनियमातील या तरतुदींच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबई महानगरातील सर्व व्यापाऱयांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अधिनियमाच्या सदर तरतुदीनुसार, आपल्या दुकाने / आस्थापनांवरील नामफलक प्रथमदर्शनी मराठी देवनागरी लिपीत व इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा मोठ्या आकारात दिसेल, अशारितीने प्रदर्शित करावा.

वाढीव मुदतीत देखील कार्यवाही न करता, अधिनियमातील तरतुदींचा भंग केल्यास दुकाने व आस्थापनांच्या मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेने हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती. जर जाहिरात होर्डिंग व्यवसायिकांनाचे कोविड काळातील परवाना शुल्क माफ केले होते. विकासकांना प्रीमियम भरण्यास सवलत देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत प्रशासन धनशक्ती पुढे झुकत असताना मराठी पाट्या करण्यावरून दिलेल्या मुदतवाढीमुळे प्रशासनाने पुन्हा आपला कल कुठे आहे हे दाखवून दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.