बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली प्रलंबित रक्कम देण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ४८२ कोटी इतकी रक्कम उपक्रमाला अदा केली आहे. यासाठी महापालिकेने सुमारे २८० कोटींच्या मुदत पूर्व मुदत ठेवी (एफ डी) मोडल्या असल्याचे बोलले जात आहे.
चालू अर्थसंकल्पात ८०० कोटींची तरतूद
बेस्ट उपक्रमाला नवीन बसेस खरेदी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देता यावी यासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद चालू अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टला निवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम देता यावी, याकरता बेस्टला तातडीने आगाऊ स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुदत ठेवी मोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील दोन मुदत ठेवी या एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठेवल्या होत्या. त्यामुळे महानगरपालिकेचा बँक खात्यात असलेले सुमारे २०३ कोटी रुपये व मुदतपूर्व ठेवी काढून त्यातून २७९ कोटी अशाप्रकारे एकूण ४८२ कोटी एवढ्या रकमेचे अधिदान उपक्रमाला आर.टी.जी.एस द्वारे करण्यात आले आहे.
(हेही वाचा – BEST नंतर आता MSRTC च्या ताफ्यात २००० इलेक्ट्रिक बसेस येणार)
विविध बँकांमध्ये BMC च्या ७३ हजार कोटींच्या मुदत ठेवी
मुंबई महापालिकेच्या सुमारे ७३ हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असून उपलब्ध होत असलेली रक्कम बँक खात्यात बिनव्याजी पडून राहू नये या उद्देशाने मुदत ठेवींमध्ये गुंतविण्यात येते. या गुंतवणुकीतून नफा मिळविणे हा उद्देश नसतो, असे महापालिकेचा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेली प्रलंबित रकमेची देणी तसेच नवीन बस गाड्या खरेदीसाठी अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून निवृत्त कर्मचाऱ्यांची देय असलेली रक्कम तात्काळ देता यावी म्हणून आतापर्यंत सुमारे ४०० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दिली आहे.