मालमत्ता कर वसुलीच्या लक्ष्यापासून १७०० कोटी रुपये दूर!

वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास, या वस्तूंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आल्याने, विभागाला हे लक्ष्य गाठणे सोपे असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे मालमत्ता कराच्या वसुलीत मोठी अडचण निर्माण झालेली असतानाच, ८ मार्च २०२१ पर्यंत एकूण ३ हजार ४८६ कोटी एवढी रक्कम वसूल करण्यात करनिर्धारण आणि संकलन विभागाला यश आले आहे. त्यामुळे पुढील २२ दिवसांमध्ये सुमारे १७०० कोटींचे लक्ष्य आहे. या वसुलीचे टार्गेट कसे पूर्ण होणार याकडे लक्ष आहे. गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणा-यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा(A.C.) यांसारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत. या वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास, या वस्तूंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आल्याने, विभागाला हे लक्ष्य गाठणे सोपे असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

५ हजार २०० कोटींचे लक्ष्य

मुंबई महानगरपालिकेकडे यंदाचा मालमत्ता कर जमा करायची अंतिम तारीख ८ मार्च २०२१ अशी होती. मालमत्ता कर भरायच्या या शेवटच्या दिवशी ४१५ कोटी ८५ लाख एवढ्या मालमत्ता कराचा भरणा नागरिकांद्वारे करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी जमा झालेली एकूण रक्कम ही ३ हजार ४८६ कोटी रुपये इतकी झाली आहे. यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे ५ हजार २०० कोटींचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत.

नागरिकांना आवाहन

या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त(प्रकल्प) पी. वेलरासू हे मालमत्ता कर वसुलीच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेत असून, त्यांच्या मार्गदर्शनात याबाबत सुक्ष्मस्तरीय नियोजन व अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे.  कर निर्धारण व संकलन खात्याचे सह आयुक्त सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा. जेणेकरुन थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा २ टक्के रकमेची दंडात्मक आकारणी, जल जोडणी खंडित करणे, चल संपत्ती जप्त करणे, अटकावणी(Attachment) करणे यासारखी विविध स्तरीय कारवाई टाळता येईल.

अशी होते कारवाई

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे अव्याहतपणे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येत असतात. या सेवा-सुविधा नियमितपणे देण्यामध्ये नागरिकांकडून कर रुपात गोळा होणा-या महसुलाची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत जमा करावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वारंवार विनंती व सूचना करण्यात येत असतात. मात्र, असे प्रयत्न करुनही वेळेत मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांवर दरमहा आवर्ती दराने शिल्लक रकमेवर २ टक्के दंडाची आकारणी  केली जाते. तर त्यानंतर  मालमत्ता कराचा भरणा न करणा-यांबाबत संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाते. त्यापुढील टप्प्यात चल संपत्ती जप्त करण्याची, अटकावणीची(Attachment) कारवाई देखील केली जाते. मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग सील करण्याची कारवाई, त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची(Property Attachment) कारवाई करण्यात येते.
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०४ व २०५ अन्वये दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टीव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यांसारख्या चल संपत्ती असणा-या बाबी जप्त करण्याची कारवाई देखील गेल्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. यानुसार सदर वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसांत न झाल्यास सदर वस्तूंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाते.

असा भरा कर

मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपानावर नागरिकांकरता (For Citizens) या पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर उघडणा-या ‘ड्रॉपडाऊन मेनू’ मध्ये ‘मालमत्ता कर’ असा पर्याय उपलब्ध आहे. यावरील संकेतस्थळासह ‘MyBMC 24×7’ या ‘अॅन्ड्रॉईड अॅप’ द्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे अॅप ‘प्ले स्टोअर’ वर मोफत उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here