नववर्षांच्या स्वागताला हॉटेल सज्ज! पण, राहणार महापालिकेसह पोलिसांची नजर!

नववर्ष स्वागताचे कार्यक्रम, समारंभ, पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याने हॉटेल्स, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आलेल्या आहेत. परंतु त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. तसेच स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यामध्ये नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढली

ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार अतिदक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी आढावा बैठक घेतली. ही बैठक आटोपताच महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची तातडीची बैठक घेत हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, इतर वैद्यकीय व संबंधित खात्यांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

( हेही वाचा : रविवारी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली! )

प्रशासनाची करडी नजर

यावेळी त्यांनी प्रामुख्याने नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून त्यादृष्टिने विविध सूचना दिल्या. नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स, उपहारगृहांवर सक्त कारवाई करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स, उपहारगृह यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here