राज्यात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या वयोगटातील मुलांचा कोरोना लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. विशेष म्हणजे मुंबई सारख्या शहरात लहान मुलांना कोरोनाची लस मिळावी म्हणून महापालिकेकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने धुमाकूळ घातल्यानंतर इतर देशांनी त्यांच्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात केली तर बऱ्याच नागरिकांचा बूस्टर डोस घेऊनही झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – इसिस संघटनेच्या दोन दहशतवादी दोषी, शिक्षेवर होणार सुनावणी)
येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यासंदर्भातली नियमावली मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं बुस्टर डोससंदर्भात नियमावली जारी केली असून पात्र व्यक्तींना कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अशी आहे नियमावली
- येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार
- वरील व्यक्तींनी दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी ते पात्र असणार
- फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार
- तिसरा डोस घेताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा
- सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार
- कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी