महापालिका अर्थसंकल्पाचे केवळ फुगेच, मग आवळली जाते हवा!

123

मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी सादर केला. हा अर्थसंकल्प ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा असून हा अर्थसंकल्प वाढीव आणि फुगीर असल्याचा आरोप होत आहे. महापालिकेच्यावतीने अशाप्रकारे मोठ्या रकमेचे अर्थसंकल्प मांडले जातात आणि मग त्यामध्ये चार ते पाच हजार कोटींनी त्यांचा आकार कमी केला जातो. प्रत्यक्षात तरतूद केलेल्या निधीचा विनियोग होत नसल्याने याचा शंभर टक्के वापर होत नाही. परिणामी अर्थसंकल्प वाढवून व फुगवून सादर केले जातात. त्यामुळे आगामी वर्षांकरता आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचा आकारही भविष्यात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मांडलेल्या ४५,९४९. २१ कोटींचा हा अर्थसंकल्प आवश्यकतेपेक्षा जास्त मांडला असून पुढील दहा वर्षांत यापेक्षा अधिक रकमेचा अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता कमीच असल्याचे काही निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सन २०१६-१७ मध्ये जेव्हा ३७०५२.५२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला गेला होता, परंतु त्यानंतर हा अर्थसंकल्प २४७७७.१० कोटी रुपये एवढा सुधारीत करण्यात आला होता.

( हेही वाचा : शिवसेनेनं मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपचा घाणाघात )

एवढेच नाही तर पुढील आर्थिक वर्षात तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी तर भांडवली खर्चाची रक्कम अनाठायी वाढवून दाखवण्याऐवजी वास्तवादी अर्थसंकल्प मांडताना याचा आकार सुमारे १२ हजार कोटींनी कमी केला होता. त्यामुळे सन २०१७-१८ मध्ये २५१४१.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला गेला, परंतु या अर्थसंकल्पाचा आकार कमी केल्यानंतरही हे सुधारीत करताना याचा आकार अधिक कमी करून तो २१९७८.३४ कोटी रुपये एवढा करण्यात आला होता. त्यामुळे महापालिका आयुक्त हे अर्थसंकल्पातील आकडे वाढवून व फुगवून दाखवत असले तरी प्रत्यक्षात सुधारीत करताना त्याचा आकार हा त्यापेक्षाही कमी करतात. विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये महिन्यामध्ये सुधारीत अर्थसंकल्पाची रक्कम निश्चित केली जात असली तरी ३१ मार्च रोजी जेव्हा त्या अर्थसंकल्पातील निधीचा वापर सुधारीत अर्थसंकल्पाएवढाही होत नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने केवळ आकडे वाढवून व फुगवून दाखवले जात असल्याचे सुधारीत अर्थसंकलपातील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

( हेही वाचा : शिवसेनेसोबत जायचं की सरकारमधून बाहेर पडायचं? ‘हा’ पक्ष द्विधा मनस्थितीत! )

तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पीय निवेदनामध्ये खात्यांची निधीच्या रकमांचा खर्च करण्याची क्षमता माफक आहे, परिणामी प्रत्यक्ष अंदाजापेक्षा भांडवली खर्च खूपच कमी होतो. परिणामस्वरुप अर्थसंकल्प फुगीर होऊन अर्थसंकल्पीय शिस्तीचा दर्जा खालावून भांडवली कामांच्या योजनांचे अवास्तव चित्र रेखाटण्यात येते,असे त्यांनी म्हटले होते.

( हेही वाचा : पवई तलाव संवर्धनासाठी महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय! )

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही हा वाढीव अर्थसंकल्प म्हणजे केवळ फुगवलेला फुगा असून जेवढी खर्च करण्याची क्षमता आहे, त्यावरच आधारीत अर्थसंकल्प बनवायला हवा. अर्थसंकल्प इतर महापालिका व राज्यांच्या तुलनेत मोठा आहे हे दाखण्यासाठी बनवला जावू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

मागील पाच वर्षातील मांडलेला अर्थसंकल्प व सुधारीत केलेला अर्थसंकल्प

सन २०१६-१७ मध्ये ३७०५२.५२ कोटी रुपये
सुधारित अर्थसंकल्प: २४७७७.१० कोटी रुपये

सन २०१७-१८ मध्ये २५१४१.५१ कोटी रुपये
सुधारित अर्थसंकल्प: २१९७८.३४

सन २०१८-१९मध्ये २७२५८.०७ कोटी रुपये
सुधारित अर्थसंकल्प:२३५१९.०२

सन २०१९-२० मध्ये ३०६९२.५९ कोटी रुपये
सुधारित अर्थसंकल्प: ३००२९.६६ कोटी रुपये

सन २०२०- २०२१मध्ये ३३४४१.०२ कोटी रुपये
सुधारित अर्थसंकल्प:३११८२.६०

सन २०२१-२२ मध्ये ३९०३८.८३कोटी रुपये
सुधारितअर्थसंकल्प:३९६१२.७७

सन २०२२-२३ मध्ये ४५,९४९.२१ कोटी रुपये

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.