मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्य शासनाने मंत्रालयासह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे याला अनुसरुन महापालिका सामान्य विभागाने ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरी प्रणालीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. परंतु बायोमेट्रीक हजेरी न लावण्याची सवलत आरोग्य विभागाला न देण्याच्या मुद्दयावर या परिपत्रकावर महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त स्वाक्षरी करत नसल्याची माहिती मिळत आहे. बायोमेट्रीक हजेरी ही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी असायला हवी, अशा प्रकारचा सूर आरोग्य विभागाची धुरा वाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मांडली गेली. त्यामुळे या सरसकट सर्वांना बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती देण्याचे परिपत्रक पुन्हा एकदा लालफितीत अडकल्याची माहिती मिळत आहे.
परिपत्रकावर स्वाक्षरी नाही
मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने म्युनिसिपल मजदूर युनियनसह काही कामगारांच्या प्रतिनिधींनी महापौरांसह अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्याच्या प्रणालीला स्थगिती देण्याचे परिपत्रक बनवले होते. या बायोमेट्रीक हजेरीला १५ दिवसांकरता तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनानेही शासकीय कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारी २०२२ पर्यंत हजेरी नोंदवण्यास स्थगिती दिली. त्यामुळे राज्य शासनाच्या या परिपत्रकानुसार सामान्य प्रशासन विभागाने या अनुसरुन दुसरे परिपत्रक जारी करत याला ३१ जानेवारी २०२२ पर्यंत स्थगिती देण्याबाबतचे परिपत्रक बनवले. हे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त तसेच आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले. मात्र, तीन दिवस झाले तरी प्रशासकीय स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही किंबहुना त्यावर स्वाक्षरी केली जात नाही.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर थांबणार नाही लोकल! कारण… )
बायोमेट्रीक हजेरीचा गैरवापर होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, या परिपत्रकाला आरोग्य विभागाने हरकत घेतल्याचे समजते. कोविड काळामध्ये मार्च २०२० मध्ये जेव्हा बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्याची प्रणाली बंद केल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून याचा गैरवापर झाला होता. कोविडचा प्रादुर्भाव जोरात असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी हे हजेरी बूकवर स्वाक्षरी करून निघून जात होते. हजेरी बूक वर त्यांची हजेरी होती, परंतु प्रत्यक्षात ते कार्यरत नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा पुन्हा वापर सुरु केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सरसकट बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा वापर ३१ जानेवारीपर्यंत बंद केल्यास ऐन कोविडच्या संसर्गाच्या काळात याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम रुग्ण सेवेवर होईल, असे आरोग्य विभागातील वरिष्ठांचे म्हणणे आहे. त्यामुळे या परिपत्रकावर स्वाक्षरी करण्यास आयुक्तांनी तुर्तास नकार दर्शवला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वगळून बायोमेट्रीक हजेरीला प्रणालीला स्थगिती देण्याचा विचारही केला जात नसल्याने हे परिपत्रक अद्यापही लालफितीतच अडकल्याचे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community