विपश्यनेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची विशेष रजा!

195

कोविडचे सावट काही प्रमाणात असून, या अनुषंगाने आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाचे व महानगरपालिकेचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्र’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘आनापानसती’ क्रिया घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती व आत्मविशास वाढतो आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होते, त्यामुळे या उपक्रमांतर्गत विपश्यनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महानगरपालिकेच्या सर्व कर्मचा-यांना विपश्यनेसाठी १४ दिवसांच्या विशेष रजेची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना विशेष रजा घेऊन विपश्यनेतून ध्यान धारणा करता येणार आहे.

३०० कर्मचाऱ्यांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ

कर्मचा-यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखून नागरी सेवा-सुविधा देण्याच्या कामात आणि प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी करी रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. शिक्षण विभागाच्या या संकुलातील अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, विभाग निरिक्षक, प्राचार्य संगीत-कला, निदेशक हस्तकला, मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई तसेच उपप्रमुख लेखापाल (शिक्षण निधी) कार्यालयातील उपप्रमुख लेखापालांसह सर्व लेखाधिकारी व त्यांच्या सर्व स्टाफ यांच्यासह सुमारे ३०० कर्माचा-यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आपापले सकारात्मक अनुभवही व्यक्त केले. या प्रशिक्षणास उपप्रमुख लेखापाल (शिक्षण निधी) राजेंद्र पवार, पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी प्रकाश चऱ्हाटे, उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे, इंदरसिंह कडाकोटी, आशा मोरे, सेवानिवृत्त ज्युनिअर ऑडिटर राम मेघराजानी आदी उपस्थित होते.

( हेही वाचा : महाराष्ट्रात गावखेड्यामध्ये पोहचणार रेल्वे )

आनापानसती हा विपश्यनेचा एक भाग

महापालिकेचे सेवानिवृत्त सह-आयुक्त शांताराम शिंदे यांनी या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना ‘आनापानसती’ क्रियेचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट केले. ‘आनापानसती’ हा विपश्यनेचा एक भाग असून, याद्वारे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले मन स्थिर केले जाते. या क्रियेद्वारे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होत असल्याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी धम्म प्रसारक एस.एन. गोयंका गुरुजी यांच्या ध्वनीफितीच्या सहाय्याने हे प्रशिक्षण देण्यात आले.

सर्वच कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या ‘मित्र’ उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘आनापानसती’ क्रिया घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती व आत्मविशास वाढतो आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीस कशाप्रकारे मदत होते, याची छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील या प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना देण्यात आली. सर्व शासकीय कर्मचा-यांना तसेच महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना विपश्यनेसाठी १४ दिवसांच्या विशेष रजेची सवलत देण्यात आली असून, याचा सर्व कर्मचा-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही या निमित्ताने शांताराम शिंदे यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.