मुंबईतील सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानाचा पुनर्विकास आश्रय योजनेंतर्गत हाती घेतला आहे. सध्या या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यासाठी राज्यपालांनी भाजपने केलेल्या तक्रारींचे निवेदन वर्ग केल्याने याच्या घोटाळ्याच्या आरोपाची चर्चा सुरू असतानाच आता पाच वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या भायखळा येथील पुनर्विकास कामात अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा विसर, सल्लागार आणि महापालिका प्रशासनाला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर महापालिकेला याची जाग आली आणि आता दीड कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
अग्निरोधक यंत्रणेचा विसर
भायखळा येथील सिध्दार्थ नगरमधील घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पहिल्या टप्प्यातील पुनर्विकास आश्रय योजनेअंतर्गत करण्यासाठी २००७मध्ये निर्णय घेण्यात आला. या निविदेची देव इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरल्याने यांच्यामार्फत ‘ए’ विंग तळमजला अधिक १७ मजले आणि ‘बी’ विंग तळमजला अधिक २३ मजले अशा दोन इमारती बांधण्याचे काम देण्यात आले. या इमारतींमध्ये १५० सदनिकांचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु या पुनर्विकास कामामध्ये अग्निरोधक यंत्रणा पुरवठा करण्याची उभारणी, चाचणी व कार्यान्वित करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला नव्हता.
( हेही वाचा : कोविड बाधितांना पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रूम’चा आधार! ‘हे’ आहेत विभागीय संपर्क क्रमांक )
एरव्ही कोणत्याही सात मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवणे आवश्यक असताना मुंबई महापालिकेच्या विभागांना याची कल्पना नसणे हे यासाठी नेमलेल्या सल्लागारांचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे अखेर या दोन्ही अग्निरोधक यंत्रणा पुरवठा उभारणी, चाचणी व कार्यान्वीकरण (सीआयटीसी) करण्याबाबत निविदा मागवण्यात आली. यामध्ये स्टार इलेक्ट्रिक कंपनी पात्र ठरली असून या कामासाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
इमारतींच्या कामांमध्ये या यंत्रणा बसवणार
- अग्निशमन आणि अग्निशामक काम
- स्प्रिंकलर्स प्रणाली बसवणे
- मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली बसवणे
- पब्लिक अड्रेस प्रणाली बसवणे
- कोर कटिंग इत्यादी