येत्या नवीन आर्थिक वर्षात पी- उत्तर विभागाचे विभाजन!

पी/उत्तर’ विभागाचे विभाजन करून पी पश्चिम आणि पी पूर्व विभागात रूपांतर करण्यास अखेर मुहूर्त सापडला असून आगामी आर्थिक वर्षापासून या दोन्ही विभाग कार्यलयाची भर पडणार आहे. सध्याच्या पी उत्तर विभागाचे विभाजन करण्यात येत असल्याने या नव्याने बनवण्यात येणाऱ्या  विभाग कार्यालयासाठी १७ नवीन पदे निर्माण करावी लागणार असून पी पूर्व विभाग कार्यालयासाठी मालाड पूर्व भागात इमारतीचा शोध सुरू आहे. सध्या महापालिकेचे २४ विभाग कार्यालय असून याची संख्या आता २५ होणार आहे.

आयुक्तांनी केली विभाजनाची घोषणा

पी/उत्तर’ विभागाचे  सुमारे ४१.०५ चौरस किलो मीटर असून यामध्ये  एकूण ९ लाख ५९ हजार ९५ एवढी लोकसंख्या आहे.  तर या विभागात एकूण नगरसेवक प्रभाग आहेत. मुंबईतील  एकूण लोकसंख्येनुसार  महानगरपालिकेतील प्रभागांच्या बदलण्यात आलेल्या रचनेनुसार विभाग कार्यालयांचे विभाजन / पुनर्रचना करणे आवश्यक असते. त्यामुळे पी उत्तर विभागाची लोकसंख्या पाहता विभागामध्ये कार्यरत यंत्रणा अपुरी पडत आहे व त्यामुळे विभागातील नागरिकांना विविध सेवा सुविधा देताना अडचणी येतात. विकासकामांना गती देता येत नाही. त्यामुळे प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी   ‘पी/उत्तर’ विभागाचे ‘पी/पूर्व’ विभाग व ‘पी/पश्चिम’ विभाग असे विभाजन करण्याची घोषणा विद्यमान आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.
त्यानुसार आता या विभाग कार्यलयाचे विभाजन पी पश्चिम आणि पी पूर्व या दोन विभागात करण्यात येत आहे. पी/उत्तर’ विभागाची नवीन इमारत बनविण्याचे काम सुरू आहे. ते जवळपास मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल. ‘पी/उत्तर’ विभागाची जुनी इमारत ही मोडकळीस आल्याने ते पाडून , नवीन इमारतीमध्ये काही विभाग सुरू करण्यात आले आहेत. या इमारतीमध्ये ‘पी/पश्चिम’ विभागाचे कार्यालय कार्यरत ठेवण्यात येईल व ‘पी/पूर्व’ विभागासाठी मालाड पूर्व विभागात सहायक आयुक्त, ‘पी/उत्तर’ व प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या माध्यमातून जागेचा शोध घेऊन नवीन वास्तू उपलब्धता करण्यात येईल.
या विभागाचे विभाजन   ‘पी/पूर्व’ व ‘पी/ पश्चिम’ विभागात झाल्यास  विभागीय रचनेनुसार त्या त्या खात्यांकरिता अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याकरिता सुमारे १७ नवीन पदे निर्माण करावी लागणार आहेत.

‘पी/पूर्व’ व ‘पी/ पश्चिम विभागातील नगरसेवकनिहाय प्रभाग क्रमांक खालीलप्रमाणे:

१) ‘पी/पूर्व’ – प्रभाग क्रमांक – ३६, ३७, ३८ ,३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४ व ४५.
२) ‘पी/पश्चिम’ प्रभाग क्रमांक ३२, ३३, ३४, ३५, ४६ ,४७, ४८ व ४९.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here