मुंबईतील ‘या’ दोन भागात पालिका उभारले वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प!

151

कोविड विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना झालेली दमछाक पाहून मुंबई पालिकेने थेट स्वतःचेच वैद्यकीय प्राणवायू सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जाण्याची मानसिकता असणाऱ्या ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ ची यातून पुन्हा प्रचिती आली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या सहकार्याने, एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय वायूरुप प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प (मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर बॉटलिंग प्लांट) उभारण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथेही वैद्यकीय द्रवरुप प्राणवायू ड्युरा सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

( हेही वाचा : कोरोनादरम्यान ‘या’ राज्यांत सर्वाधिक बालकांचं हरवलं छत्र )

देशातील पहिली पालिका

कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत इतर शहरे आणि राज्यातून वैद्यकीय प्राणवायू आणून मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे प्राण वाचवले. एका रात्री तर युद्धसदृश्य परिस्थिती हाताळून दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना सुरक्षितपणे हलवावे लागले, इतकी प्राणवायूची कमतरता आपण अनुभवली. अशी स्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून महानगरपालिकेने तेव्हाच स्वतःचे वैद्यकीय प्राणवायू साठवण व सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. आज या प्रकल्पांच्या लोकार्पणातून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून अशाप्रकारचे प्रकल्प असणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची नोंद झाली आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कोविड विषाणूचे डेल्टा व ओमायक्रॉन हे दोन्ही उपप्रकार अद्याप फैलावत असून सर्वांनी मास्कचा उपयोग, हातांची स्वच्छता, सुरक्षित अंतर यासारख्या नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी अखेरीस केले.

( हेही वाचा : महापालिकेच्या ‘या’ विभागांच्या प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची खांदेपालट )

माहूल व महालक्ष्मी येथील ऑक्सिजन सिलिंडर बॉटलिंग प्लांट हे जणू संजीवनी प्रकल्प आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई व महाराष्ट्राबाहेर प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णांना यातना सहन कराव्या लागल्या, मात्र त्याही स्थितीत मुंबईने योग्य दक्षता व नियोजन याआधारे रुग्णांचे प्राण वाचवले. आता ऑक्सिजन सिलिंडर बॉटलिंग प्लांटमुळे पैसा आणि वेळही वाचणार आहे. ही सर्व कामगिरी इतर शहर व राज्यांनाही दिशा देणारी आहे. आपल्या प्रकल्पांमधून वेळप्रसंगी इतरांनाही मदत करता येईल. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कामगिरीची देशपातळीवर वाखाणणी केली जाते, असे सांगून मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक निर्देशांचे पालन करावे आणि प्राणवायू पुरवठ्याची चिंता करु नये, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.

spirit of mumbai

या दोन्ही प्रकल्पांतून वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध होणार असल्याने कोविड इतर (नॉन कोविड) प्राणवायूची बचत होईल आणि आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले तर, कोविड व्यवस्थापनामध्ये धारावी मॉडेल पाठोपाठ ऑक्सिजन मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करण्याचे कामकाज महानगरपालिकेने केले आहे. असे सांगत खासदार राहूल शेवाळे यांनी पालिकेचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

( हेही वाचा : धक्कादायक! एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गायब! )

महालक्ष्मी प्रकल्पामधून १०० ते १२० ड्युरा सिलिंडर भरणे शक्य होणार

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल याप्रसंगी म्हणाले की, कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रसंगी, महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आपण ‘वातावरणातील हवा शोषून त्यातून प्राणवायू निर्मिती’ करणारे प्रकल्प (पीएसए प्लांट) उभारले. मुंबईत सध्या १८६ कोविड रुग्णालये असून आपत्कालीन प्रसंगी एका रुग्णालयातून इतर रुग्णालयांना प्राणवायू मदत पाठविण्यासाठी विविध मर्यादा येतात. माहूल व महालक्ष्मी येथील प्राणवायू प्रकल्पांमध्ये साठवण व पुनर्भरण अशा दोन्ही सुविधा आहेत. त्यामुळे मुंबईतील १८६ रुग्णालयांमध्ये कधीही, कोठेही प्राणवायू पोहोचविण्यास मोठा हातभार लागणार आहे. कोविडची साथ शिखरावर असताना दिवसाला २०० ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज भासत होती. आता एकट्या महालक्ष्मी प्रकल्पामधूनच १०० ते १२० ड्युरा सिलेंडर भरणे शक्य होणार आहे, यातून महानगरपालिकेने साध्य केलेली क्षमता सिद्ध होते, असे डॉ. चहल यांनी नमूद केले.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू पुरवठा समस्येवर योग्य नियोजनाने आपण मात केली. असे असले तरी त्यातून बोध घेत ऑक्सिजन सिलिंडर बॉटलिंग प्लांट उभारले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्राणवायूचा साठा करण्यासह ऑक्सिजन सिलिंडर्सचे योग्य वितरण करणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱयांनी दिवसरात्र धावपळ करुन आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या, अवघ्या ३ ते ४ महिने कालावधीत प्रकल्प उभारले, माहूलमधील कामांसाठी बीपीसीएलचे देखील अतिशय मोलाचे सहकार्य मिळाले, याचा उल्लेख करीत महापौर, सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या योग्य समन्वयातून हे घडून आले, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले.

अ) माहूल स्थित वायूरुप वैद्यकीय प्राणवायू सिलिंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयीः

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वायूरुप वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारला आहे. सुमारे ८५० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर हा प्रकल्प साकारला आहे. येथे एकूण ३ तीन कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. यामध्ये महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी केली आहे. बीपीसीएल मुंबई रिफायनरीने या प्रकल्पासाठी हातभार म्हणून सार्वजनिक उत्तरदायित्व स्वरुपात संयंत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत, बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील बीपीसीएलने टाकली आहे.

spirit of mumbai 1

बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होते. पैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वायूरुप वैद्यकीय प्राणवायू महानगरपालिकेच्या माहूलमधील सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या पुनर्भरण प्रकल्पामध्ये ७.१ घनमीटर क्षमतेचे सुमारे ११२ सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये सुमारे ८०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. २४ तासांच्या तीन सत्रात मिळून, १५ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध झाल्यास त्यातून किमान १ हजार ५०० जंबो सिलिंडर भरले जावू शकतात. प्राणवायूच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची तरतूद देखील करण्यात आली आहे. पुनर्भरण केलेले सिलिंडर्स रुग्णालयांपर्यंत वाहून नेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वतःची वाहतूक व्यवस्था देखील उभी केली आहे.

( हेही वाचा : १९९३ च्या स्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा पाकिस्तानात मृत्यू )

ब) महालक्ष्मी रेसकोर्स स्थित द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलिंडर्स पुनर्भरण प्रकल्पाविषयीः

महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू ड्युरा सिलिंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे १३ हजार लीटर द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवता येईल, इतकी मोठी टाकी आहे. या प्रकल्पामध्ये एकाचवेळी प्रत्येकी २१० लीटर क्षमतेचे १० सिलिंडर्स भरता येवू शकतात. या प्रकल्पाची दररोज १०० ते १२० सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. त्याच्या प्रचालनासाठी प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. तसेच, सिलिंडर्स वाहतुकीसाठी २ विशेष परावर्तित वाहनेदेखील नेमण्यात आली आहेत. वापरात असलेल्या वाहनांमध्येच आवश्यक ते बदल करुन ती उपलब्ध करण्यात आल्याने, नवीन वाहने खरेदीचा खर्च वाचला आहे, हेही महत्त्वाचे आहे. एकूणच, या प्रकल्पाच्या उभारणीमुळे ड्युरा सिलिंडर पुनर्भरणाचा खर्च सुमारे ३५ ते ४० टक्के कमी झाला असून यातून महानगरपालिकेची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.