दहावीच्या मुलांसाठी १९ हजार ४०१ नवीन टॅब : प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर

81

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या मुलांसाठी टॅबची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या प्रस्तावाबाबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी लेखी स्वरुपात स्थायी समितीला पत्र लिहूनही त्यांना बोलू न देता बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर केल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे तब्बल १९ हजार ४०१ टॅब खरेदी केली जाणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून हे टॅब वितरीत करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येत असून यापूर्वी आठवी, नववी आणि दहावीच्या मुलांसाठी सुमारे ४४ हजार टॅबची खरेदी केल्यानंतर आता दहावीच्या मुलांसाठी आणखी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जात आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी ही खरेदी केली जाणार होती. परंतु कोरोनामुळे या खरेदीला विलंब झाला असून यासाठी मागवलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी ‘इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी पात्र ठरली आहे.

( हेही वाचा : भाजपचे महापौरांना पत्र, ‘या’ नेत्यावर दाखवला अविश्वास )

नवीन टॅब आगामी शैक्षणिक वर्षापासून वितरीत करणार

सन २०२१-२२ या कालावधीसाठी या टॅबची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये एका टॅबची खरेदी एक वर्षाच्या हमी कालावधीसह ११ हजार रुपयांमध्ये खरेदी केली जात आहे. याशिवाय चार वर्षांची जास्त गॅरंटी, अभ्यासक्रम तयार करणे व टॅबमध्ये अपलोड करणे यासाठी अधिक ६ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार ४०० रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे एकूण १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी ३८ कोटी ७२ लाख २४ हजार ५५९ रुपये खर्च केला जाणार आहे. महापालिका शाळांमधील दहावीच्या मुलांना पाठ्यक्रम समाविष्ट असलेले हे टॅब असून सध्या जुने टॅब हे दहावीच्या विद्यार्थ्यांकडे आहेत. त्यामुळे टॅबअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसून जुन्या टॅबवर त्यांचा अभ्यासक्रम सुरु आहे. तर नवीन टॅब हे आगामी शैक्षणिक वर्षापासून वितरीत केले जातील, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा : व्हॉट्स ॲप चॅट बॉट’…पालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवांची घरबसल्या माहिती मिळणार!! )

प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आल्यानंतर यावर सत्ताधारी पक्ष अधिक बोलू देणार नाही याची कल्पना आल्याने भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र लिहून २०१५ मध्ये २२ हजार ७९९ टॅबची खरेदी करताना, प्रत्येकी ६ हजार ८५० दराने खरेदी केली होती. तर २०१७ मध्ये टॅब १० हजार रुपयांमध्ये खरेदी केले होते, मग सन २०२१-२२मध्ये टॅब खरेदीत एवढी मोठी वाढ का झाली याचा खुलासा करण्याची मागणी केली होती. तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या टॅबच्या वापराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कोरोना काळात विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा जास्त ई-लर्निंगची आवश्यकता असताना महापालिकेच्या नियोजनाचा अभाव दिसून आला असल्याची खंतही व्यक्त केली. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.