मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली असली तरी तुर्तास पुढील १५ दिवसांकरता प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्याच्या या प्रणालीचा वापर करण्यास केवळ १५ दिवसांची स्थगिती दिली असून त्यानंतर पुढील बैठकीत यावर प्रशासनाच्यावतीने निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईसह देशात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बायोमेट्रीक हजेरी नोंदवल्यास त्याद्वारे याचा संसर्ग होऊ शकतो, याकरता मार्च २०२० मध्ये बायोमेट्रीक हजेरीसाठी राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे याची अंमलबजावणी महापालिकेत करण्यात आली होती. परंतु आता कोविडचा आजार नियंत्रणात असल्याने नोव्हेंबरमध्ये सामान्य प्रशासनाने सर्व विभागाने १ जानेवारीपासून बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्याच्या दृष्टीकोनातून आपापल्या विभाग तथा खात्यांमध्ये मशीन्स कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व विभागांनी बायोमेट्रीक हजेरीच्या मशीन्स बसवण्यात आल्या होता.
कामगार संघटनेची मागणी
परंतु वाढत्या कोविड रुग्णांची संख्या पाहता बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत होती. कामगारांकडून याला विरोध होत होता. अशाप्रकारे बायोमेट्रीक हजेरी नोंदवल्यास यामुळे संसर्ग अधिक वाढू शकतो, अशी भीती कामगार आणि त्यांच्या संघटनांकडून व्यक्त होत होता. या संदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनने महापौरांसह आयुक्तांनाही निवेदन सादर केले होते. त्यामुळे यासंदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनचे पदाधिकारी यांनी अतिरिक्त संजीव कुमार आणि सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये त्यांनी या प्रणालीचा वापर पुढील १५ दिवस करू नये अशाप्रकारे निर्देश देत तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती मिळाली आहे
हजेरीला स्थगिती
म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष वामन कविस्कर व कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी याबाबत सोमवारी बैठक पार पडली असून बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती दिल्याची माहिती दिली आहे. पुढील १५ दिवसांनी आढावा घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, अशा प्रकारचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार व सहआयुक्त मिलिन सावंत यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community