मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कधी नव्हे, तर प्रथमच दिवाळीनिमित्त २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. परंतु या सानुग्रह अनुदानाच्या रकमेतून कामगार संघटनांच्या झोळीत ४०० ते ५०० रुपयांची भर प्रत्येक कामगारांमागे पडली. मात्र कामगारांच्या झोळीत पडलेल्या रकमेतून २० टक्के रक्कम महापौर निधीला देणगी स्वरुपात देण्याचे आवाहन केले आहे. एका बाजूला महापालिका कर्मचाऱ्यांची म्युनिसिपल बँक ही २५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीला देते, मात्र दुसरीकडे महापौर कामगार संघटनांकडे सानुग्रह अनुदानातील रक्कम महापौर निधीला देण्याचे आवाहन करत आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांनी आणि कर्मचारी, अधिकारी संघटनांनी महापौर निधीच्या कल्याणकारी कार्याचा खारीचा वाटा उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व कामगार संघटनांना २१ डिसेंबर रोजी पत्र लिहून हे आवाहन केले आहे. या वर्षी सर्व कामगार संघटनांनी, त्यांच्या सभासदांना मिळालेल्या सानुग्रह अनुदानामधून संघटनेसाठी देणगी म्हणून वजा केलेल्या रकमेचा २० टक्के भाग महापौर निधीला देणगी स्वरूपात द्यावा, असे आवाहन केले आहे. जेणेकरून आपल्या माध्यमातून महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी यांकडून, त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार न पडता, महापौर निधीस देणगी प्राप्त होईल आणि अप्रत्यक्षरित्या त्यांचे महापौर निधीस साहाय्य लाभेल, असे महापौरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
निधीतून रूग्णांना अर्थसहाय्य मिळाण्यास मदत होईल
वादळ, पूर, दुष्काळ, भूकंप, घरे कोसळणे व आगी लागणे यांसारख्या दुर्घटनांमधील आपत्तीग्रस्तांसहीत हृदयरोग, मूत्रपिंडविषयक आजार, कर्करोग इत्यादी मोठ्या आजारांसंबंधातील शस्त्रकिया आणि उपचार यांकरिता अर्थसहाय्य देण्यात येते. डायलिसीसच्या रुग्णांना वर्षातून एकदा १५ हजार रुपये आणि उर्वरित रूग्णांना २५ हजार रुपये एवढी मदत महापौर निधीतून केली जाते. मुंबई शहरात मिळणा-या उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण भारतातून हजारो रुग्ण दररोज मुंबईत दाखल होतात. रुग्णांना उपचारासाठी येणारा वाढता खर्च काही अंशी भागविण्याच्या उद्देशाने महापौर निधीकडे दरवर्षी मोठ्या संख्येने मदतीसाठी विनंती अर्ज प्राप्त होतात. त्यापैकी अधिकाधिक रूग्णांना निधीतून अर्थसहाय्य मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असतो. परंतु अर्जाची संख्या आणि उपलब्ध निधी यांच्या व्यस्त गुणोत्तरामुळे अनेक अर्जदारांच्या पदरी निराशा येते, असेही महापौरांनी या पत्रात म्हटले आहे.
( हेही वाचा : ‘३१ डिसेंबर’च्या आधीच धारावीत धाड! बनावट विदेशी मद्याचा 3 लाखांचा माल जप्त )
कर्मचाऱ्यांच्या बॅंकेद्वारे मदत
यापूर्वी महापौरांनी मुंबईच्या २३२ नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधान हे महापौर निधीला देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महापौर निधीमध्ये नगरसेवकाच्या मानधनातून भर पाडण्याचा प्रयत्न करत असताना आता कामगार संघटनांनाही महापौरांनी आवाहन केले आहे. मात्र, एकीकडे महापौर निधीमध्ये भर पाडण्याचा प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे महापालिका कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या दि म्युनिसिपल बँकने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. मात्र, या बँकेला महापौर निधीला मदत करत येत नाही का असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
Join Our WhatsApp Community