दादरमधील रानडे मार्गावरील नक्षत्र मॉलजवळील सिग्नलजवळ मॅनहोल्सच्या परिसरातील काही भाग खचून भलामोठा खड्डा पडला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून त्यानंतर याची पाहणी करून या खड्डयाभोवती बॅरकेट्स तयार करण्यात आले आहे. पावसाळी जलवाहिनीच्या मॅनहोल्सशेजारील रस्त्याचा भाग खचला जावून खड्डा पडल्याने कुठे तरी रस्त्याखालील वाळू वाहून गेल्याने तो भाग खचला गेला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
( हेही वाचा : मुंबई सावरलीच नाही, तर नवीन जीवनशैलीने पुढे निघाली )
शेजारील जागेतून रस्ता वाहतुकीसाठी खुला
दादर पश्चिम येथील रानडे मार्गावरील क्रांतीकारी बाबाराव सावरकर चौकातील सिग्नल जवळच असलेल्या एका मॅनहोल्सच्या शेजारी रस्ता खचून त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या खड्ड्या भोवती बॅरेकेट्स उभारुन शेजारील जागेतून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री याठिकाणी रस्ता खचून खड्डा पडत असल्याची बाब येथील वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ त्या भोवती बॅरेकेट्स उभे केले. त्यानंतर महापलिकेच्या रस्ते व पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून खड्डा खोदून पाहिला. त्यानंतर पुन्हा त्याभोवती बॅरेकेट्स उभारण्यात आले.
लवकरच या रस्त्याचे काम हाती घेणार
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मॅनहोल्सला गळती असल्यास त्यामुळे बांधकामाला धोका पोहोचतो.परिणामी बांधकाम वाहून गेल्यास अशाप्रकारची कॅविटी तयार होते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मॅनहोल्सच्या परिसरात रस्त्याखाली पोकळी निर्माण होऊन रस्ता खचण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील मॅनहोल्स परिसराचे काम हाती घेऊन ते दुरुस्त केले जाईल.
दरम्यान, रानडे मार्ग हा सिमेंट काँक्रिटचा असून हा रस्ता खराब झाल्याने सिमेंट काँक्रिटवर डांबराचा थर चढवून अस्फाल्टचा रस्ता बनवण्यात आला आहे. परंतु आता या रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जाणार असून यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे काम हाती घेतले जाण्याचीही शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community