मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या (शिवाजी पार्क) दैनंदिन देखभाल,दुरुस्तीसाठी आजवर कधीही कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नव्हती.परंतु या मैदानावर हिरवे गवत उगवून त्यावर हिरवळ राखत धुळमुक्त शिवाजीपार्क बनवण्यात येत असल्याने याच्या देखभालीसाठी आता बागवानची नेमणूक केली जात आहे. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून तीन वर्षांसाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
( हेही वाचा : मालमत्ता कर वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला; अधिकारी जखमी )
कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाचा आता कायापालट होत आहे. शिवाजी महाराज पार्क मैदानातील धुळीमुळे आसपासच्या इमारतीतील रहिवाशी त्रस्त असून त्यांना दिलासा देण्यासाठी मैदानाच्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करत हे मैदान धुळमुक्त करण्यात येत आहे. या मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे गवताळ भाग तयार करण्यात आल्याने येत्या एप्रिल आणि मेपर्यंत संपूर्ण शिवाजीपार्क परिसरातील गवत चांगल्याप्रकारे वाढले जाणार आहे. त्यामुळे या गवताची निगा राखण्यासाठी आता या मैदानाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेच्या जी उत्तर विभागाने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने जाहिरात निविदा प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये तीन वर्षांकरता सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरुन निविदा मागवण्यात आली.
आजवर मुंबईतील उद्यान, मैदानांच्या दैनंदिन देखभालीसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली जात होती. परंतु शिवाजीपार्कच्या देखभालीसाठी कधीही कंत्राटदाराची नेमणूक केली जात नव्हती. आजवर संबंधित क्लबच्या माध्यमातून त्या परिसराची देखभाल केली जायची. परंतु आता या मैदानावर हरित पट्टा निर्माण केल्याने त्यांची निगा राखणेही आवश्यक आहे. असे स्पष्ट करत महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. त्यादृष्टीकोनातून कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये १२ माळी आणि १२ सफाई कामगारांचा समावेश असेल. जेणेकरून मैदानाला पाणी मारणे, पंप सुरु करणे तसेच मैदान परिसराची स्वच्छता राखण्यासह विविध कार्यक्रम व सभांच्या आयोजनानंतर तेथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवर राहणार आहे. शिवाजीपार्क मैदानाची योगयप्रकारे देखभाल होईल आणि हिरवळ कायम राखण्यात मदत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या निविदेनुसार महिन्याला सरासरी आठ लाख रुपयांचा खर्च येणार असून वर्षांला सुमारे १ कोटींचा खर्च अपेक्षित मानला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानांचा वापर टक्केवारीमध्ये
- एकूण शिवाजीपार्क मैदानाचे क्षेत्रफळ : १ लाख चौरस मीटर
- पदपथाचे क्षेत्रफळ : १० टक्के
- स्पोर्टस क्लबचे क्षेत्रफळ : २० टक्के
- क्रिकेटच्या खेळपट्टी : २५ टक्के
- फुटबॉल खेळपट्टी : ५ टक्के
- जॉगिंग आणि सायकल ट्रॅक : ६ टक्के
- इतर नवीन खेळ : ३ टक्के
- उर्वरीत खेळाची मोकळी जागा : ३१ टक्के
- एकूण ८ क्रिकेटच्या खेळपट्टया : १५०० चौरस मीटर