मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले असले तरी अद्यापही नालेसफाईच्या कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात न आल्याने सफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. जानेवारीपासून नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे अपेक्षित असताना मार्च महिना संपत आला तरी सफाई कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के गाळ काढण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे. एरव्ही सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांचेही नालेसफाईच्या कामांवर लक्ष असले तरी यंदा मात्र, प्रशासक नियुक्त असल्याचे सफाई न झाल्याने तुंबणाऱ्या पाण्याचे खापर प्रशासनावर आणि पर्यायाने सरकारवर फोडले जाणार आहे.
( हेही वाचा : आयकराच्या सखोल चौकशीची भीती कुणाला? )
प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समितीपुढे सादर
मूंबईतील विविध मोठ्या, छोट्या नाल्यांसह पेटीका नाले तसेच रस्त्यांलगतच्या जलमुखांची साफसफाई करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी महिन्यांपूर्वीच हे प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असतात. परंतु यंदा निविदा प्रक्रिया पूर्ण करून मार्च महिन्यांमध्ये याचे प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आले होते. यंदा नालेसफाईच्या विविध कामांसाठी सुमारे १७० कोटी रुपये खर्च केले जात असून याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर न राखून ठेवण्यात आले. परिणामी या राखून ठेवलेल्या प्रस्तावांवर आता प्रशासकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु २१ दिवस उलटत आले तरी स्थाय समितीने राखून ठेवलेल्या १२३ प्रस्तावांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला. या १२३ प्रस्तावांमध्ये नालेसफाईच्या प्रस्तावांचाही समावेश आहे.
दरम्यान, पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रस्तावाला मंजुरी मिळतातच त्वरीत कामाला सुरुवात होईल. एप्रिलमध्ये कामाला सुरुवात झाली तरी पावसाळ्यापूर्वीच्या अपेक्षित कामांचे लक्ष्य गाठले जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मोठ्या नाल्यांची स्वच्छता
- परिमंडळ २ : कंत्राटदाराचे नाव : भूमिका ट्रान्सपोर्ट (कंत्राट मूल्य : १२.६१ कोटी रुपये)
- परिमंडळ ३ : कंत्राटदाराचे नाव : त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट (कंत्राट मूल्य : १०.१९ कोटी रुपये)
- परिमंडळ ४: कंत्राटदाराचे नाव : सीएन लाधानी (कंत्राट मूल्य : १२.४७ कोटी रुपये)
- परिमंडळ ५: कंत्राटदाराचे नाव : त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट (कंत्राट मूल्य : १५.२४ कोटी रुपये)
- परिमंडळ ६ : कंत्राटदाराचे नाव : सी एन लाधानी (कंत्राट मूल्य : ०९.५९ कोटी रुपये)
- परिमंडळ ७ : कंत्राटदाराचे नाव : अक्यूट डिझाईन्स (कंत्राट मूल्य : १०.९७ कोटी रुपये)
- पश्चिम उपनगरातील छोटे नाले, पेटीका नाल्यांची साफसफाई : सुमारे ५४ कोटी रुपये
- शहर भागातील जलमुखांची साफसफाई : सुमारे ८ कोटी रुपये