मुंबईतील आरोग्य यंत्रणा सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बंद होणाऱ्या प्रिन्स अली रुग्णालयाकडे कानाडोळा

माझगाव येथील प्रिन्स अलीखान रुग्णालयाची इमारत अतिधोकादायक असल्याचे सांगून आधी रुग्ण दाखल करून घेणे बंद करणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापनाने आता हे रुग्णालयच पूर्णपणे बंद करण्याचा घाट घातला आहे. धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून चालवले जाणारे हे रुग्णालय बंद करण्यात येत असल्याने येथील सुमारे एक हजार विविध डॉक्टर,नर्ससहित रुग्णालयीन कर्मचारी हे बेकारीच्या खाईत लोटले जाणार आहे. एका बाजुला मुंबईतील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आढावा घेणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा भायखळ्यातील या बंद होणाऱ्या रुग्णालयाकडे कानाडोळा केला जात आहे.

( हेही वाचा : निर्मला सीतारामन यांनी केले पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे कौतुक )

प्रथम ओपीडी आणि त्यानंतर शस्त्रक्रीयागृह बंद

भायखळा-माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत अतिधोकादाक असल्याचा अहवाल २० ऑगस्ट २०२२ रोजी प्राप्त झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने नवीन रुग्णांना दाखल करण्यास मनाई केली. तळ अधिक चार मजल्याच्या या रुग्णालयीन इमारतीत विविध प्रकारच्या रुग्णांसाठी वॉर्ड असून रुग्णालयाने इमारत अतिधोकादायक असल्याचा स्ट्रक्चरल ऑडीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रथम ओपीडी आणि त्यानंतर शस्त्रक्रीयागृह बंद केला. त्यामुळे येथील डॉक्टर, नर्स, आया, वॉर्डबॉय यांच्यासह सर्व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसलेले आहे. त्यामुळे रुग्णालयातील कामगारांच्या संघटनेने याचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून पुन्हा स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या नावाखाली हे रुग्णालयच रुग्णांअभावी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोविडमध्ये चांगल्याप्रकारे काम करून आता हे रुग्णालय बंद झाल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

प्रिन्स अलीखान कामगार संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या स्ट्रक्चरल ऑडीटनंतर रुग्ण दाखल करणे बंद केले, आणि १२ सप्टेंबरला दुसरे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम व्यवस्थापनाने केले. त्यानंतर त्यांनी दोन्ही प्रवेशद्वार बंद करून कर्मचाऱ्यांना असलेला प्रवेश बंद केला. हे रुग्णालय धोकादायक दिसतच नसून आम्ही स्व:खर्चाने महापालिकेचय पॅनेलवर स्ट्रक्चरल ऑडीटर करून याचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेतो,अशी मागणी व्यवस्थापनाकडे करूनही ते आम्हा कामगारांना परवानगी देत नाही. हे रुग्णालय बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले तरीही कोणाकडूनही दाद दिली जात नाही. मग येथील ९०० ते १००० कर्मचाऱ्यांनी करायचे काय असा सवाल तळेकर यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here