दुकानांमधील सेल्फ टेस्टिंग कोविड किटकरता लवरकच एसओपी

132

वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकल्या जाणाऱ्या सेल्फ टेस्टिंग कोविड कीटची आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : पुन्हा एकदा झोपड्या कोविड प्रतिबंधकतेच्या मार्गावर )

मुंबईतील कोविड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी ३ जून २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

चौथी लाट येण्याची शक्यता

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल याप्रसंगी म्हणाले की, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच, आता पावसाळाही सुरु होणार असून पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे.

महानगरपालिकेच्या सर्व नियमित प्रमुख रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्या दाखल करुन घेता येईल व त्यांच्यावर योग्य उपचार होतील, अशारितीने तयारी करावी. तसेच सर्व खासगी रुग्णालयांनादेखील आपापल्या स्तरावर सर्व तयारी करुन सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले जावेत. मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.

कोविड विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल. १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे. कोविड उपाययोजनांशी संबंधित तातडीचे प्रस्ताव, त्यांच्या फाईल्स (नस्ती) प्राधान्याने मार्गी लावाव्यात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.