मालाड पश्चिम येथील महर्षी वाल्मिकी मंदिर परिसरातील पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यावर अखेर महापालिकेने उपाय शोधला असून या भागातील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. येथील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या अत्यंत जीर्ण झाल्याने त्या आता बदलण्यात येणार आहे.
पाणी वाहिन्या बदलण्यात येणार
मुंबई महापालिकेच्या मालाड पश्चिम मधील महर्षी वाल्मिकी मंदिर परिसरात पावसाळ्यादरम्यान पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर आता पर्जन्य जलवाहिनी खात्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यात पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या मोडकळीस आलेल्या असून जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता अपुरी असल्याने पावसाळ्यात पाणी वाहून नेण्यावर मर्यादा येत आहे. परिणामी आसपासच्या परिसरात पावसाळी पाण्याचा निचरा संथ गतीने होऊन पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.
( हेही वाचा : मुंबईतील सर्व शाळांना मराठीतून फलक लावण्याची सक्ती )
महापालिकेने ज्या पाणी साचण्याच्या ठिकाणांची यादी बनवली होती, त्यात या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे मालाड पश्चिममधील महर्षी वाल्मिकी मंदिर परिसरातील विविध ठिकाणच्य पावसाळी पाणी वाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये सी.एन. लाधानी एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी ३ कोटी ५९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. हे काम पावसाळ्यासह सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community