महापालिकेत संजीवकुमारांचा स्वप्नभंग?

99

मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील पश्चिम उपनगरासह आरोग्य विभाग आणि अन्य महत्वाच्या विभागांची जबाबदारी डॉ.संजीवकुमार स्वत:कडे वळता करून घेण्यात यशस्वी ठरले. यासाठी त्यांनी नवीन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती होण्यापूर्वी शहर विभागाच्या जबाबदारीतून मुक्त होत पश्चिम उपनगराचा पदभार आपल्याकडे घेतला. परंतु अतिरिक्त आयुक्तपदी आशिष शर्मा यांची नियुक्ती झाल्याने संजीवकुमार हे सर्वांत कनिष्ठ अधिकारी असल्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडे शहर विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संजीवकुमार यांचे आता स्वप्नभंग होण्याची दाट शक्यता आहे.

महापालिकेत संजीवकुमारांचा स्वप्नभंग?

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी आशिष शर्मा यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्याकडे शहर विभागासह सामान्य प्रशासन विभाग, परवाना विभाग, मालमत्ता विभाग, बाजार, देवनार, प्रिटींग प्रेस, सीटीआरसी, पर्यावरण, यांत्रिक व विद्युतसह नियोजन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आला आहे. पूर्वी हा संपूर्ण पदभार डॉ. संजीवकुमार यांच्याकडे होता. परंतु सुरेश काकाणी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील पश्चिम उपनगराचा अतिरिक्त कार्यभार संजीवकुमार यांच्याकडे सोपवला होता. पण आठ दिवसांमध्येच संजीवकुमार यांनी काकाणी यांच्याकडे असलेल्या आरोग्य विभागासह घनकचरा व्यवस्थापन, आपत्कालिन विभाग, सुरक्षा, मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण, जंबो कोविड सेंटर, क्षेपणभूमी आणि निवडणूक विभाग त्यांनी आपल्याकडे घेतला होता. आणि आपल्याकडील शहर भागासह महत्वाच्या विभागाचा पदभार काकाणी यांच्या रिक्तजागी निश्चित करत अतिरिक्त कार्यभार म्हणून आपल्याकडे ठेवला.

( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या स्थानकासह कार्यशाळेत १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स)

डॉ. संजीवकुमार हे भारतीय प्रशासन सेवेतील २००३च्या तुकडीतील असून नव्याने रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा हे १९९७च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यामुळे संजीवकुमार यांच्यापेक्षा शर्मा ज्येष्ठ असताना त्यांच्याकडे शहर विभागाचा भार सोपवण्यात आल्याने आजवरच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. महापालिकेत शर्मा हे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या १९९५च्या तुकडीतील असून महापालिकेत सर्वांत ज्येष्ठ अधिकारी आहेत. ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर पी. वेलरासू आणि चौथ्या क्रमांकावर डॉ. संजीव कुमार हे आहेत. त्यामुळे सर्वांत कनिष्ठ अधिकारी असलेल्या संजीवकुमार यांच्याकडे शहर विभागाचा भार सोपवावा लागणार असून काकाणी यांच्याकडील पदभार आपल्याकडे घेण्याची घाई करणाऱ्या संजीवकुमार यांना आता शर्मा यांच्यामुळे पुन्हा एकदा शहर विभागाचा भार सांभाळावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.