मिलन ‘सब-वे’तील साचणाऱ्या पाण्याचे हे शेवटचेच वर्ष

पश्चिम उपनगरातील ‘हिंदमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलन सब वे मधील तुंबणाऱ्या पाण्यावर आता कायमचाच रामबाण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाताच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भूमिगत टाक्याप्रमाणे मिलन सब वेच्या ठिकाणी टाक्या बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याचे काम सध्या ४० ते ५०टक्के पूर्ण झाले असून हे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात मिलन सब वेतील पाणी समस्या दूर होणार आहे. त्यामुळे मिलन सब वेच्या तुंबणाऱ्या पाण्याचे हे शेवटचे वर्ष ठरणार आहे.

मिलन सब वेमधील पाणी साचण्याचे प्रमाणे कमी होईल

पश्चिम उपनगरातील पावसाळ्यात सर्वात जास्त पाणी तुंबण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजे मिलन सब-वे. याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा वाहनांचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सब वेमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निवारण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मिलन सब वेमधील तुंबणाऱ्या पाण्याकरता के पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मिलन सब वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मि.मी व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ज्याद्वारे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा जलद गतीने होईल आणि मिलन सब वेमधील पाणी साचण्याचे प्रमाणे कमी होईल. त्यानंतर त्या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित करून भूखंडाची जागा नियमित वापरासाठी केली जाणार आहे. यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च केले जात आहे. यासाठी महापालिकेने देव इंजिनिअरींग या कंपनीची नियुक्ती केली आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला )

हिंदमाताच्या ठिकाणी याच कंपनीच्या माध्यमातून भूमिगत टाकीची बांधकाम केले होते, त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून मिलन सब वेचे काम सुरु असून आठ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर एप्रिल महिन्यापासून या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यांमध्ये भूमिगत टाकी उभारण्याचे ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबतत पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मेस्त्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिलन सब वेच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी ज्या भूमिगत टाक्या बनवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत टाकी बांधण्याचे काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात थोडाफार पाणी साचण्याचा प्रकार घडला तरीही त्याठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा जेवढ्या लवकर होईल,अशाप्रकारे प्रयत्न केला जाईल,असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here