मुंबई महापालिका शाळांमधील मुलांनी बनवलेल्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील सहभागी विध्यार्थ्यांनी ज्या राख्या आपल्या कुशलतेने बनवल्या आहेत, त्यातील उत्कृष्ट निवडक राख्या स्पर्धेच्या परीक्षक व शिक्षण विभागाकडे पाठवून उर्वरीत राख्या या खासगी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कच्छ राजस्थानच्या सीमेवरील जवानांकरता पाठवण्यात आल्या आहेत.
श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून आर -दक्षिण, आर- मध्य आणि आर- दक्षिण या महापालिका विभागातील अर्थात दहिसर ते कांदिवली या भागातील महापालिका शाळांमधील मुलांची राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. महानगर शाळेमधील इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वीच्या मुलांसाठी राखी बनवण्याची स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी मुलांनी मोती, सटिन रिबीन तसेच धाग्यांसह विविध साहित्याचा वापर करत आकर्षक अशा राख्या साकारल्या.
यामध्ये एकूण १७६ मुलांनी विविध प्रकारच्या राख्या बनवल्या होत्या. यातील ३६ राख्या स्पर्धेसाठी निवडण्यात आल्या असून त्यातून उत्कृष्ट राख्यांमधून क्रमांक निवडले जाणार आहेत. तर उर्वरित १४० राख्या या अमित पाटील व अजित गुप्ता यांनी खासगी स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने राजस्थान कच्छ या सीमेवरील जवानांना पाठवल्या. कार्यानुभव निर्देशिका तृप्ती पेडणेकर यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. या आयोजित स्पर्धेत महापालिकेच्या आर विभागाच्या कार्यानुभव केंद्रप्रमुख भार्गव मेहता, उपकेंद्रप्रमुख कुशल वर्तक, वरिष्ठ विषय शिक्षक विजय मांडवकर यांनी विशेष मेहनत घेतली. तर या कार्यक्रमात शिक्षिका रुपाली बारी यानी उपस्थितांचे आभार मानले.