निवडणुकीसाठी महापालिका सज्ज: अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाकडेच

153

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या २३६ प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाला ५ मार्च रोजी सादर करण्यात आल्यानंतरही अद्याप यावर कोणत्याही प्रकारची भूमिका निवडणूक आयोगाच्यावतीने जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रभाग रचनेच्या सिमांचा आराखडा रद्द करण्यात आला आहे की निवडणूक आयोग मंजूर करणार आहे याबाबत माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे. मात्र, अद्याप आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सूचना निवडणूक आयोगाकडून नसून महापालिकेच्या माध्यमातून मतदान केंद्र आणि मतदार यादी सुधारीत करण्याची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक झाली तरी महापालिका सज्ज असल्याचे निवडणूक विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

दोन-तीन दिवसांमध्ये प्रभागांच्या सीमा होणार जाहीर

मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांच्या सिमा निश्चित करून याबाबतचा प्रारुप आरखड्यानंतर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. या हरकती व सूचनांनंतर त्यांच्या सुनावणी घेऊन याचे विवरण तयार करण्यात आले. त्यामुळे याचे विवरण २ मार्च रोजी सादर करणे आवश्यक होते. परंतु निवडणूक आयोगाने ही तारीख ५ मार्चपर्यंत पुढे ढकलल्याने महापालिकेने या अंतिम प्रभाग रचनेचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या प्रभागांच्या सीमा प्रसिध्द होणे अपेक्षित होते.

विधीमंडळाकडून रचनेचा आराखडा रद्द?

दरम्यान राज्य मंत्रीमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना व प्रभाग आरक्षणाचे अधिकार आपल्याकडे घेऊन निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडे ठेवण्याचे विधेयक मंजूर केले. या विधेयकानुसार यापूर्वी बनवण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा रद्द करण्याचा निर्णय विधीमंडळाने घेतला आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने अद्यापही यावर कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसून कदाचित या विधेयकामुळेच आयोगाने याची अंतिम प्रभाग रचनेची अंतिम यादी प्रसिध्द केली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – मुंबईत केवळ २७ कोविडचे रुग्ण : कोविडच्या लसीची मात्रा लागू )

८५०० केंद्रांच्या तुलनेत ११ हजार केंद्र बनविण्यात येणार

याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही अंतिम प्रभाग रचनेबाबतचा कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. परंतु निवडणूक विभागाच्या माध्यमातून मतदार यादी बनवणे तसेच ८५०० मतदान केंद्रांच्या तुलनेत ११ हजार मतदान केंद्र बनवण्याची कार्यवाही सुरु आहे. याशिवाय १८ झोनमध्ये निवडणूक साहित्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. निविदा काढून संस्थांची नेमणूक करुन ठेवली जात असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर झाली तरी महापालिकेची त्याला सामोरे जाण्याची तयारी असेल असे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.