मुंबई महापालिकेची विक्रमी करवसुली : ५,७९२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल

170

महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ७०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ५ हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतक्या मालमत्म्ता कराची वसूली करण्यात कर निर्धारण व संकलन विभागाला यश आले आहे. महानगरपालिकेच्या इतिहासातील ही विक्रमी कर वसुली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

( हेही वाचा : मंगळवारी पूर्व उपनगरांतील ‘या’ भागात पाणीकपात )

मागील २ वर्षांपासून कोविड विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे जनजीवनाला आणि अर्थव्यवस्थेला निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वाढत्या संख्येने मालमत्ता कर संकलन करुन आपले नाणे खणखणीत सिद्ध केले आहे. महापालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास मोटे व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातत्याने नियोजन व आढावा बैठकांचे आयोजन केले. या नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही व आवश्यक तेथे सक्त कारवाई यांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात आली. परिणामी, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५,७९२.२२ कोटी रुपये एवढी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा कर संकलन ७०० कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांनी म्हणजेच १३.७७ टक्क्यांनी वाढले आहे. यंदाची कर वसुली महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. या कामगिरीबद्दल करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी – कर्मचारी आणि विभाग स्तरावर कामकाज करणारे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी अभिनंदन केले आहे.

मुंबईत ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती तथा निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ पासून ही सवलत लागू करण्यात आली आहे. एकूण १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. सवलतीचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवत आणि कर संकलनावर कोणताही विपरित परिणाम न होवू देता महानगरपालिका प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे.

जी दक्षिण विभाग कर वसूलीत आघाडीत

महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण २१ विभागांनी गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक कर वसुली करण्यात आली आहे. पैकी, जी/दक्षिण विभागाने सर्वाधिक ३४.३४ टक्के, त्याखालोखाली एफ/उत्तर विभागाने ३२.९२ टक्के तर पी/दक्षिण विभागाने ३३.७१ टक्के इतकी वाढ गतवर्षाच्या तुलनेत केली आहे. त्यापाठोपाठ एच/पश्चिम २७.९३ टक्के, एच/पूर्व विभागात २४.३० टक्के आणि एफ/दक्षिण विभागात २३.७० टक्के अधिक कर संकलन झाले आहे. एवढेच नव्हे तर शासकीय मालमत्ता कर वसुलीत देखील यंदा १८८.६२ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात २.०१ कोटी रुपये शासकीय मालमत्ता कर संकलन झाले होते. तर यंदा ५.८१ कोटी रुपये म्हणजे ३.८० कोटी रुपये इतके अधिक कर संकलन झाले आहे.

तीन वर्षांमधील कर वसूली

  • ३१ मार्च, २०२० : ४ हजार १६१ कोटी रुपये
  • ३१ मार्च, २०२१ : ५ हजार ०९१ कोटी रुपये
  • ३१ मार्च, २०२२ : ५ हजार ७९२ कोटी रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.