महापालिकेच्या माटुंगा येथील वाघजी केब्रिज शाळेसह चेंबूरमधील शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या शहरी शेतीअंतर्गत छतावरील शेती अर्थात रुफ गार्डनिंगची संकल्पना आता महापालिकेच्या सर्वच शाळांमध्ये राबवण्याचा मानस आहे. या शाळांमधून पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनांमध्ये करण्याचा विचार महापालिका शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुले आता खऱ्या अर्थाने शेतकरी बनवणार असून स्वत: भाजी पिकवून स्वत:च्या मध्यान्ह भोजनाची सोय करणार आहेत.
( हेही वाचा : उत्तर प्रदेशचा ‘धडा’ केंद्र सरकार गिरवणार का? )
महापालिकेच्या २५० शालेय इमारतींमध्ये शहरी शेती
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार दोन सनदी अधिकाऱ्यांच्या हाती आल्यापासून महापालिकेच्या या शाळांमधून नाविन्यपूर्ण विविध वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे आणि सहआयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्या मदतीने शिक्षण विभागाला नवीन दिशा देण्याचे काम करत विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे महानगरपालिकेच्या माटुंग्यातील एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता. नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. त्यासोबतच शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. वाघजी शाळेप्रमाणे चेंबूर कलेक्टर शाळेतही अशाप्रकारच्या शहरी शेतीचा प्रकल्प राबवण्यात आला. या दोन्ही शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या २५० शालेय इमारतींमध्ये शहरी शेती उपक्रम राबवला जाणार आहेत. त्यामुळे ६०० ते ७०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाण्याचा मानस महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आहे.
मधान्ह भोजनामध्ये वापर
महापालिका डब्यूआरएस संस्थेच्या माध्यमातून ऑरगॅनिक ग्रीन सोल्यूशन अंतर्गत ही शहरी शेतीचे उपक्रम राबवत असून सीएसआर निधीतून हे उपक्रम महापालिकेच्या विविध शाळांमध्ये राबवले जाणार आहेत. महापालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्या दोन शाळांमध्ये शहरी शेतीचे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर महापालिकेच्या सर्वच शालेय इमारतींमध्ये हे उपक्रम राबवले जाणार आहे. शालेय इमारतींच्या गच्चीवर ही शेती प्रामुख्याने केली जाणार आहेत. आणि जिथे शालेय इमारतीच्या परिसरात मोकळी जागा उपलब्ध असल्यास त्या जागेवर अशाप्रकारची शेती विद्यार्थ्यांच्या मदतीने केली जाणार आहे. मुलांना शेती कशी केली जाते आणि शेतीतून भाजीपाला कशाप्रकारे पिकवला जातो याचे शेतीविषयक ज्ञान या माध्यमातून प्रत्यक्षात कृतीतून दिले जाणार आहे. या शेतीमध्ये पिकवणाऱ्या जाणाऱ्या भाजीचे प्रमाण वाढल्यानंतर या भाजीपाल्याचा वापरही मुलांच्या मधान्ह भोजनामध्ये केला जाणार आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.
मुलांना शेतीविषयक कामांमध्ये आवड करण्याचा हा प्रयत्न असून शेती सारख्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवणे हाही प्रयत्न आहे. मात्र, यासाठी महापालिकेचा निधी खर्च केला जाणार नसून यासाठी आवश्यक असणारा निधी सीएसआार निधीतून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community