मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर सात महिने उलटले असून महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणऱ्या विकास प्रकल्पांसह विविध कामांचे प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेने मंजूर करत कामे हाती घेतली जात आहेत. मात्र, प्रशासकांच्या काळांमध्ये विकास कामांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होऊन मान्यताही त्वरेने मिळत असल्याचे चित्र दिसून आल्याने सध्या मागवण्यात आलेल्या निविदा आणि भविष्यात मागवण्यात येणाऱ्या निविदांना ब्रेक लावण्याच्या सूचना मंत्रालयातून प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून सर्व विभागांच्या प्रमुखांना तशा प्रकारच्या सूचना गेल्या आहेत.
( हेही वाचा : उद्धव गट आणि शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कुणाला किती दिली पार्किंग?)
प्रत्येक विभागांना आता थोडं थांबा असाच सबुरीचा सल्ला वरिष्ठांनी दिला आहे. ज्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून त्यांच्या कामांना गती देण्याचा निर्धार प्रशासनाकडून केला जात आहे. मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात तसेच प्रकल्प कामांसंदर्भात मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. या बैठकीला आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त व सहआयुक्त हे उपस्थित होते. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी सर्व विभागांच्या प्रमुखांना आणि प्रमुख अभियंत्यांना सूचना गेल्या असून त्यानुसार नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असेल त्या थांबवा आणि नवीन प्रक्रिया आपल्या मान्यतेशिवाय राबवू नका. त्यामुळे सर्व विभागांच्या माध्यमातून नव्याने मोठ्या विकास कामांचे तसेच प्रकल्पांच्या निविदा थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून नव्याने निविदा मागवल्या जात नसून प्रशासकांच्या काळांमध्ये घाईघाईत मागवण्याचा जो सपाटा सुरु आहे,तेच याचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. भविष्यात महापालिका अस्तित्वात येईल आणि लोकप्रतिनिधी आल्यावर आपल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत विकासकामांना विरोध करतील अशी भीती कंत्राटदारांना वाटत आहे.या भीतीने प्रशासकांच्या माध्यमातून विनाअडथळा मंजूर होणाऱ्या प्रकल्पांच्या प्रस्तावांचा अंदाज घेत काही कंत्राटदार हे विभाग प्रमुखांना निविदा प्रक्रिया राबवण्याची घाई करत असल्याची माहिती समोर आल्याने हा ब्रेक लावला गेला असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून नवीन विकास कामांच्या निविदा थांबवण्यात आल्या असून मुंबई सुशोभीकरणा अंतर्गत ज्या १७०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत, त्याच कामांच्या निविदाना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मिळत आहे. सौंदर्यीकरणामध्ये रस्ते, पूल, उद्याने यासह सर्व विभाग कार्यालयांच्या स्तरावर सार्वजनिक ठिकाणे निश्चित करून १६ प्रकारची तातडीने कामे हाती घेण्यात आहेत.
Join Our WhatsApp Community