चर्नीरोड रेल्वे स्थानकाचा झोपडप्यांचा विळखा सुटला, ३२ झोपड्यांवर महापालिकेची कारवाई

142

चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला असणाऱ्या महर्षी कर्वे मार्गावरील पदपथांना मागील अनेक महिन्यांपासून घातलेला झोपड्यांचा विळखा अखेर महापालिकेने सोडवला. या मार्गावरील पदपथावर तब्बल ३२ अनधिकृत झोपड्या होत्या. या सर्व झोपड्यांवर महापालिकेच्यावतीने सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. या झोपड्या हटवल्यानंतर या पदपथाच्या सुशोभिकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

( हेही वाचा : महापालिकेत आता पूर्ण क्षमतेने आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी; आणखी २५ ठिकाणी बसवणार प्रणाली )

३२ अनधिकृत झोपड्या

चर्नीरोड स्टेशन (पूर्व) नजिक असणा-या महर्षी कर्वे मार्गावरील सैफी रुग्णालयाजवळील परिसरात आणि चर्नीरोड स्टेशन लगत असणा-या महर्षी कर्वे मार्गावर पावसाळ्या दरम्यान ३२ अनधिकृत झोपड्या निर्माण झाल्या होत्या. पदपथांवर व पदपथानजिक या झोपड्यांमुळे पादचा-यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. तर अनेकदा पादचारी हे पदपथा नजिकच्या रस्त्यावरुन चालत असल्याने अपघाताची संभाव्यता वाढण्यासोबतच वाहतुकीलाही अडथळा येत होता. त्यामुळे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या डि विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी या ३२ झोपड्यांवर धडक कारवाई करत त्या झोपड्या हटविल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेच्या ८० कामगार – कर्मचारी – अधिकारी यांची चमू घटनास्थळी कार्यरत होती. त्याचबरोबर मोठ्या आकारातील पाईप उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा मशिनही या कारवाईसाठी वापरण्यात आले, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

या कारवाईसाठी ‘डी’ विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश कनोजा, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) संजय पोळ, वाहतूक पोलिस अधिकारी खिलारे, दुय्यम अभियंता (रस्ते) अभिजित रसाळ यांच्यासह महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागातील ८० कामगार – कर्मचारी – अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर कार्यरत होते. झोपड्या हटविल्यानंतर या ठिकाणी कीटक नियंत्रण खात्याद्वारे फवारणी करण्यासह संबंधित कचरा डंपरद्वारे तात्काळ हटविण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर पदपथ बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या पदपथाचेही सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचीही माहिती उघडे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.