अंधेरी पश्चिम येथील अनधिकृत असलेल्या ‘अंधेरी बाझार’ वर अखेर महापालिकेने हातोडा चालवला. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत संबंधितांनी बांधकाम नियमित न केल्याने महापालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून ही कारवाई सुरु असून आतापर्यंत या तीन मजली बांधकामाचे ७० टक्के काम पाडण्यात आले आहे.
( हेही वाचा : सदावर्तेंवरील पोलीस कारवाईमुळे जे. जे. मधील १२२ कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या )
बांधकामावर हातोडा
अंधेरी पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील तळ अधिक तीन मजल्याचे ‘अंधेरी बाझार’ येथे अनधिकृतरित्या बांधकाम झाल्याने याला महापालिकेने नोटीस बजावली होती. या नोटीस विरोधात संबंधितांनी न्यायालयात धाव घेत सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने १२ आठवड्यांमध्ये हे बांधकाम नियमित करून घ्यावे अशाप्रकारचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतर त्यांनी हे बांधकाम नियमित न केल्याने अखेर मागील आठवड्यात येथील बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे. हे बांधकाम तोडू नये म्हणून सर्व बाजूंनी दबाव येत असतानाही के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता पाटील यांच्या टिमने पोलिस बंदोबस्तात हे बांधकाम तोडण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
बांधकाम तोडले
याबाबत के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोर्टान दिलेल्या मुदतीनंतरही बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया पार न पाडल्याने यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.तब्बल १२ ते १४ हजार चौरस फुटाचे हे बांधकाम असून आजबाजुलाही बांधकामे असल्याने यंत्राच्या सहाय्याने तोडकाम करता येत नाही. त्यामुळे मनुष्यबळाचा वापर करत हे बांधकाम तोडले जात असून आतापर्यंत ६० ते ७० टक्के बांधकाम तोडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community