ससाणे, क्षिरसागर आणि नांदेडकर या सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांची पुन्हा खांदेपालट करण्यात आली असून तीन महिला सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांना कांदिवली आर- दक्षिण विभागात तर ए विभागाच्या सहायक आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आलेल्या स्वप्नजा क्षिरसागर यांची बदली एच-पूर्व विभागात करण्यात आली आहे. कांदिवली आर- दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांची बदली बाजुच्याच म्हणजे बोरीवली आर-मध्य विभागाची जबाबदारी सोपवली आहे.

( हेही वाचा : दिल्लीत डेंजर झोन! ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता?)

मागील दोन महिन्यांपासून महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र असून आधी बदल्या करणे आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करून पुन्हा त्याच जागी कायम ठेवणे अशाप्रकारच्या कार्यपध्दतीमुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यावर टिका होत होती. राजकीय हस्तक्षेपामुळे या बदल्या होत असल्याची टिका होत असल्याने आयुक्तांनाही यावर माध्यमातून स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

मात्र, ,वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व या एच -पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अलका ससाणे यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वरचष्मा असल्याने त्यांच्या सांगण्यानुसारच विभागातील कामे केली जात होती. ससाणे या केवळ शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सांगण्यानुसारच काम करत असल्याच्या यापूर्वी अनेकदा तक्रारी येत होत्या. मात्र, सत्तापालट झाल्यानंतर त्यांची बदली झाली नव्हती. एका बाजुला जी- उत्तर विभागाचे किरण दिघावकर, जी -दक्षिण विभागाचे शरद उघडे यांची बदली झाल्यानंतर ससाणे यांचीही बदली होईल अशाप्रकारची शक्यता होती. परंतु ससाणे मात्र या विभागात कायम राहिल्या.

परंतु ससाणे यांना कांदिवली आर- दक्षिण विभागात पाठवण्यात आले आहे. कांदिवली विभागात भाजपचे प्राबल्य असून याठिकाणी ससाणे किती दिवस टिकतात याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. तर नियमित बदलीनुसार एफ- दक्षिण् विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांची बदली ए विभागात केली होती. परंतु त्यांची बदली झाल्यानंतरही या विभागाचा पदभार कार्यकारी अभियंता शिवदास यांच्याकडे ठेवला. क्षिरसागर यांनी कौटुंबिक कारणामुळे ए विभागाऐवजी पश्चिम उपनगरातील कोणताही विभागाची जबाबदारी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे ससाणे यांची बदली केल्यांनतर त्या रिक्त जागी क्षिरसागर यांची बदली करण्यात आली आहे.

तर आर- दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदी योग्यप्रकारे काम करणाऱ्या संध्या नांदेडकर यांची बदली आता बोरीवली आर- मध्य विभागाच्या सहायक आयुक्तपदी केली आहे. नांदेडकर यांनी यापूर्वी दहिसर आर -उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली कांदिवली आर -दक्षिण विभागात झाली होती. परंतु तिथे दोन वर्षही पूर्ण झालेली नसताना त्यांना हटवून बोरीवली आर मध्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. बोरीवली आर -मध्य विभागाची जबाबदारी सध्या कार्यकारी अभियंत्याकडे होती. ते प्रभारी सहायक आयुक्त म्हणून काम करत होते.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

  • एच पूर्व सहायक आयुक्त अलका ससाणे :(बदलीचे ठिकाण -कांदिवली आर दक्षिण विभाग)
  • सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर : (बदलीचे ठिकाण वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व एच पूर्व)
  • आर दक्षिण सहायक आयुक्त संध्या नांदेडकर : ( बदलीचे ठिकाण बोरीवली आर मध्य)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here