सेनापती बापट मार्गावरील अनधिकृत फेरीवाले तुपाशी, क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील भाजी विक्रेत उपाशी

137

मुंबई महापालिकेच्या दादरमधील क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमध्ये घाऊक भाजी विक्रीचा व्यवसाय केला जात असला तरी प्रत्यक्षात मंडईबाहेरच रस्त्यांवर फेरीवाल्यांकडून जागा अडवून व्यवसाय केला जातो. मंडईपासून शंभर मीटर परिक्षेत्रामध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी असतानाही अनधिकृत फेरीवाले मंडईबाहेर घाऊक भाजीचा व्यवसाय करत आहेत, परंतु मंडईतील अधिकृत गाळ्यांमधील परवानाधारक भाजी विक्रेत्यांना याचा फटका बसत आहे.  मात्र, महापालिकेच्या मंडईतील भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायात अनधिकृत घाऊक भाजीचा व्यवसाय करणारे फेरीवाले अडसर ठरत असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मंडईतील परवानाधारक भाजी विक्रेते उपाशी आणि अनधिकृत घाऊन भाजी विक्रेते तुपाशी अशी अवस्था झाली आहे.

(हेही वाचा – आंबेडकर अनुयायांसाठी ‘या’ भागातील महिलांनी बनवल्या १६,६५० चपात्या)

दादर येथील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये दरदिवशी राज्याच्या विविध जिल्ह्यामधून घाऊक विक्रीसाठी येत असतात. दरदिवशी राज्यातील अनेक भागांमधून मुंबईतील या दादर भागांमध्ये भाजीचे २०० ट्रक येतात. तसेच छोट्या, मोठ्या वाहनांमधून १  हजार भाजी विक्रेते याठिकाणी येत असल्याने याठिकाणच्या गर्दीचे प्रमाण  नियंत्रण विविध उपाययोजना करूनही ही गर्दी कमी करण्यात महापालिका आणि पोलिसांना अपयश येत आहे. या सर्व शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून काही फेरीवाले हे सेनापती बापट मार्गावर झारापकर पर्यंत आपले धंदे थाटतात. या रस्त्याच्या आतील बाजुस महापालिकेची क्रांतिसिंह नाना पाटील घाऊक भाजी मंडई असून किरकोळ विक्रेत्यांना घाऊक भाजी मंडईबाहेरच रस्त्यावर फेरीवाल्यांकडे उपलब्ध होत असल्याने ग्राहक मंडईमध्ये  भाजी खरेदीसाठी येत नाही. याचा फटका मंडईतील परवाना धारक भाजी विक्रेत्यांना बसत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने ते मंडई बाहेरील रस्त्यांवर व पदपथावर फेरीवाल्यांस बसण्यास मुभा देतात. या फेरीवाल्यांना पदपथांसह रस्तेही अडवून ठेवल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या शेतकऱ्यांना आपले टेम्पो रस्त्यांवर उभे करावे लागतात, परिणामी या वाहनांमुळे सेनापती बापट मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेष म्हणजे याठिकाणी येणाऱ्या ट्रक आणि छोट्या वाहनांना तिथे आपली वाहने उभी करण्यासाठी काही मंडळी पैसे वसूल करतात. वाहने लावण्यास जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपली वाहने उभी करण्यासाठी तसे पैसेही मोजावे लागतात,असे काही टेम्पो चालकांचे म्हणणे आहे. हे पैसे बेकायदा वसूल केले जात असून जी व्यक्ती हे पैसे या वाहन मालक तथा चालकांकडून वसूल करते, त्याच व्यक्तींचीच माणसे ही  घाऊक भाजी विक्रीकरता फेरीवाले म्हणून रस्ते आधीच अडवून ठेवत व्यवसाय करत असल्याचे स्थानिकांमधून ऐकायला येते.

भाजपच्या दादर-माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी स्थानिकांच्या तक्रारीनुसार सेनापती बापट मार्गावरील फेरीवाले आणि वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात महापालिकेचे अधिकारी व वाहतूक पोलिसांनाही धारेवर धरले. राज्यातील विविध जिल्ह्यातून येणाऱ्या ट्रकला आपला भाजीपाला रिकामा करण्यासाठी वेळ लागतोच. त्यांना आपली वाहने उभी करण्यासाठी रस्त्यांवर जागा मिळायला हवी. पण या रस्त्यावर या शेतकऱ्यांना आपली वाहने उभी करण्यासाठी पैसे द्यावे लागतात. केवळ रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे भाजीची वाहने रस्त्यांवर उभी केली जात असतानाही महापालिकेकडून या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही.  हे फेरीवाले घाऊक भाजी विक्रीची मंडई असलेल्या क्रांतिसिह नाना पाटील मंडईसमोर बसून घाऊक भाजीचा व्यवसाय करतात. जर महापालिकेची अधिकृत घाऊक मंडई असताना तिथे फेरीवाले घाऊक भाजीचा व्यवसाय करून एकप्रकारे महापालिकेच्या अधिकृत गाळेधारकांच्या व्यवसायावर टाच आणतात.

जर मंडईपासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाले बसण्यास बंदी आहे, तर मग ही कारवाई महापालिका का करत नाही? या मंडईत जर भाजी विक्री होते तर मग त्या मंडईबाहेर किमान भाजीचा व्यवसाय कुणी करू नये याची काळजी महापालिकेने घ्यायाल नका का असा सवाल करत अक्षता तेंडुलकर यांनी आज या मंडईबाहेरील भाजीच्या फेरीवाल्यांमुळे मंडईतील अधिकृत गाळेधारकांकडे कुणी भाजी खरेदीला जात नाही. त्यामुळे जर महापालिकेचे अधिकृत गाळेधारकांवर अन्याय करून अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण देत असतील तर याची गय केली जाणार नसून याविरोधात आपण रस्त्यावर उतरु असा इशारा तेंडुलकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.