चारकोप सेक्टर ७ मधील दुर्गंधी पसरवणारे तलाव कात टाकणार

चारकोप सेक्टर ७ मधील तलावाचे आता सुशोभीकरण केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतच्या सर्व परवानगी प्राप्त झाल्याने याच्या सुशोभीकरणाच्या मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या तलावाला नाल्याचे स्वरूप आले होते, तो भाग आता खऱ्या अर्थाने सुशोभित होऊन चारकोपवासियांना मनोरंजनाचे आणि फिरण्याचं एक नवीन ठिकाण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या तलावात लाकडी पूल उभारून पर्यटकांना मोकळा श्वास आनंदही लुटता येणार आहे.

( हेही वाचा : भूमिगत कामात महापालिका नंबर वन! पण पवई-घाटकोपर जल बोगद्याचे काम अर्धवट रखडले )

कांदिवली चारकोप सेक्टर ७ मधील खाडीच्या जवळील या तलावाच्या भागात समुद्र भरतीच्या वेळी राजेंद्र नगर मधून वाहणाऱ्या नाल्यातील कचरा तसेच प्लास्टिक या तलावात जमा होत होते. त्यामुळे तलावातील साचलेले पाणी आणि कचरा यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण केले जावे अशी मागणी सातत्याने होत होती. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी आराखडा आणि संकल्पचित्र तयार करण्यात आले. महापालिकेच्यावतीने कोलाज डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी बनवलेला या तलावाचा प्रारूप आराखडा सादर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. तलावाची जागा शासनाची असल्याने याठिकाणी सुशोभीकरण करण्याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावावर उपनगर जिल्हाधिकारी यांनी ना- हरकत प्रमाणपत्र दिले आहे. तसेच सुशोभीकरणाचा प्रारुप आराखड्यास कांदळवन संधारण घटक (तीवर क्षेत्र)तसेच महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण( एम. सी. झेड. एम. ए.) आणि राज्य पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरण (एस. ई.आय. ए .ए.)यांची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सहभागाने केलेला प्रकल्प आराखडा आणि संकल्पचित्रे याप्रमाणे आता त्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने तलावाचा विकास

या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये ‘पिरॅमिड कंट्रक्शन’ या कंपनीला विविध करांसह ७.७१ कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने या कामासाठी ८.१८ अंदाजित खर्च वर्तवला होता. पण कंत्राटदाराने उणे ३१.५९ टक्के दराने निविदा बोली लावून काम मिळवले आहे. या तलावाचे एकूण क्षेत्रफळ ४२६४.२८ चौरस मीटर एवढे आहे. हे काम पावसा वगळून अठरा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे चारकोप वासियांना येणाऱ्या २०२४ पर्यंत हे मनोरंजनाचे एक ठिकाण उपलब्ध होणार आहे. पश्चिम उपनगरातील उत्तर दिशेला बोरिवली आणि दहिसर मध्ये तलाव असली तरी कांदिवलीतील हे तलाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केले जाणार आहे.

( हेही वाचा : …तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो निवडणूक कार्यक्रम! )

-सुशोभीकरणाचे अशाप्रकारे होणार काम

  • प्रवेशद्वार आश्रय स्थान तयार करणे
  • शौचालय बांधणे
  • तलावाच्या सभोवती पदपथ तयार करणे
  • खुली व्यायाम शाळा तयार करणे
  • लहान मुलांना खेळण्यासाठी जागा तयार करणे
  • प्रेक्षागृह तयार करणे
  • लाकडी पूल तयार करणे
  • तलावाच्या काठाला दगडी बांधकामाचे एकसंध बांधकाम करणे
  • तलावाच्या सभोवती सजावटीच्या प्रकाश योजना
  • तलावाच्या काठी संरक्षित भिंत बांधणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here