मुंबईतील अनेक वाहतूक नियंत्रण सिग्नलच्या जागी स्वयंचलित वाहतूक सिंग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून वाहनांच्या वर्दळीनुसार येथील वाहन शोध कॅमेऱ्यांद्वारे सिग्नल पडतात. मात्र, यापैंकी अनेक वाहन शोध कॅमेऱ्यांचे आयुष्यमान संपुष्टात येत असल्याने अशाप्रकारे नादुरुस्त झालेले कॅमेरे बदलण्यात येत आहे. त्यामुळे महापलिकेच्यावतीने या २५० नवीन कॅमेरांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे जे कॅमेरे खराब झाले आहेत, ते कॅमेरे तात्काळ बदलले जाणार असून एकप्रकारे सिग्नलवरून धावणाऱ्या वाहनांची योग्य मोजदाद करण्याच्या दृष्टीकोनातून या कॅमेरांची दृष्टी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंचे ठरले; ‘या’ तारखेपासून राज्यभर दौरे करणार )
मुंबईतील वाहतूक सिग्नलसाठी मध्यवर्ती समन्वय साधण्यासाठी वाहतूक नियंत्रण यंत्रणा ही अद्ययावत प्रणाली विकसित करण्यात आली असून रस्त्यांच्या संबंधित कॉरिडॉरवरील सिग्नलच्या स्टॉपलाईन जवळील १०० ते १२० मिटर्स अंतरावर बसवण्यात आलेल्या वाहन शोध कॅमेऱ्याद्वारे वाहतूक सिग्नलसाठी वेळेचा डेटा संकलित केला जातात. मुंबईतील वाहतूक सिंग्नलवर क्षेत्र वाहतूक नियंत्रण या प्रकल्पांतर्गत सन २००८-०९मध्ये वाहन शोधक कॅमेरे बसवण्यात आले होते. या कॅमेरांचे उपयुक्त आयुष्यमान संपुष्टात आलेले असल्यामुळे वास्तविक वेळेनुसार कार्यरत असलेल्या वाहतूक नियंत्रण यंत्रणा प्रणालीच्या कार्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाहन शोध कॅमेरे यांच्या संलग्न उपकरणांसह बदलणे असल्याने महापालिकेच्यावतीने सुमारे २५० शोध कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शोध कॅमेऱ्यांचे मूळ उत्पादक असलेल्या ट्रॅफिटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून यासाठी ४.६८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या रस्ते(वाहतूक) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत सुमारे ६०० ठिकाणी सिग्नल यंत्रणा असून ३०० ठिकाणी स्वयंचलित वाहतूक नियंत्रण सिग्नल आहेत. ज्याद्वारे सिग्नल यंत्रणा स्वयंचलित असून प्रत्येक वाहनांची नोंद येथील सिग्नल कॅमेरांद्वारे घेतली जाते. रस्त्यांवरील वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नल दर्शवले जाते,अशाप्रकारचे हे कॅमेरे आहेत. यातील बहुतांशी कॅमेरा खराब झाल्याने ते बदलण्यासाठी सुमारे २५० कॅमेरांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एमएमआरडीए, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये जानेवारी २००५मध्ये झालेल्या सांमजस्य करारानुसार सन २००५-२००६ पासून वाहतूक नियंत्रण व्यवस्थेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करणे आवश्यक होते. हा करार केवळ पाच वर्षांसाठी होता आणि त्यानंतर एटीसी संबंधित सर्व बाबी सुरु ठेवण्याची जबाबदारी पर्यायाने महापालिकेकडे असल्याने हा खराब झालेल्या कॅमेरा बदलण्याच्या दृष्टीकोनातून २५० कॅमेरे खरेदी केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community