सलग चौथा सॅटेलाईट टेगिंग फ्लेमिंगो पक्षी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर शास्त्रज्ञांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गुजरात राज्यात सलग चार सॅटेलाईट टेगिंग फ्लेमिंगो पक्षी पोहोचल्यानंतर बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गुजरात राज्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. चारही फ्लेमिंगो ज्या भागात वास्तव्य करत आहेत, त्या भागाला भेट देऊन सद्यस्थितीतील फ्लेमिंगो पक्ष्यांचे राहणीमान, संबंधित भागात इतर पक्ष्यांचे अस्तित्व तसेच संवर्धनात्मक उपाय याबाबतचा अभ्यास गुजरात दौऱ्यात केला जाईल.
याआधी हुमायून, सलीम, मॅकेन हे तीन सॅटेलाईट टेगिंग केलेले तिन्ही फ्लेमिंगो पक्षी गुजरातमधील भावनगरला पोहोचले होते. तिन्ही फ्लेमिंगो पक्ष्यांना गुजरात राज्यात पोहचून महिना होत नाही, तोपर्यंत चौथा लेस्टरने 21 जुलै रोजी सायंकाळी मुंबईचा किनारा सोडला. हा किशोरवयीन वयातील ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी असून त्याला प्रसिद्ध निसर्गतज्ज्ञ आणि पक्षीशास्त्रज्ज्ञ कॅप्टन सी.डी. लेस्टर यांच्या स्मरणार्थ ‘लेस्टर’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिले.

लेस्टरबाबतीत शास्त्रज्ञांचे निरीक्षण 

  • 21 जुलैच्या संध्याकाळी लेस्टरने मुंबईचा किनारा सोडला. 22 जुलै रोजी रात्री लेस्टर हा कच्छचे छोटे रण या भागात पोहोचला.
  • 500 किमी अंतर कापण्यासाठी त्याला 25 तास लागले.
  • लेस्टरचा उड्डाणमार्ग ठाणे खाडी सोडणाऱ्या हुमायून पक्ष्यासारखा आहे.
  • लेस्टरने 21 जुलै 2022 रोजी 21.29 वाजता भांडुप पंपिंग स्टेशनवरून प्रवास सुरू केला, तो 22 जुलै 2022 रोजी 6.30 वाजता गुजरातमधील नरबाद येथे पोहोचला.
  • कच्छचे छोटे रण येथील भारतीय वन्य गाढव अभयारण्यात उड्डाण करण्यापूर्वी नरबादजवळ त्याने 11.33 तासांसाठी विश्रांती घेतली.
  • लेस्टर सध्या झिंझुवाडा शहराजवळ आहे.

(हेही वाचा रेडिओ कॉलर वाघिणींना सोडण्यापूर्वी हवा अॅक्शन प्लान)

पहिल्या फ्लेमिंगो पक्ष्याचा संपर्क तुटला

30 जून रोजी गुजरात राज्यातील भावनगर परिसरात पहिल्या सॅटेलाईट टेगिंग फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन झाले. हुमायून असे नाव असलेल्या लेसर फ्लेमिंगो प्रजातीचा पक्षी सध्या संपर्काबाहेर गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनी दिली. पक्षी मोबाईल नेटवर्कमध्ये असले की, त्यांच्या हालचालींची आम्हाला माहिती मिळते. हा पहिला अनुभव नाही. काही पक्षी महिन्याभराच्या अंतराने पुन्हा संपर्कात येतात.

प्रजननासाठी नजीकच्या भागात फिरत असल्याचा अंदाज

हुमायून कच्छच्या अंतर्गत भागात फिरत असल्याचा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. सध्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे हुमायून कच्छच्या अंतर्गत भागात असावा. भावनगरच्या पाणथळ जमिनीत अद्यापही सलीम आणि मॅकेन स्वच्छंदपणे विहार करत असल्याची माहिती डॉ. खोत यांनी दिली

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here