फ्लाइटला तीन तास उशीर, अभिनेते मनोज जोशी एअर इंडियावर संतापले; पहा व्हिडिओ

159

ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी बुधवारी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला. मनोज जोशी भोपाळहून मुंबईत आले. मात्र, त्यांना प्रवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. 3 तासांच्या विलंबानंतर भोपाळहून विमानाने उड्डाण केले. त्यानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर मनोज जोशी यांना त्यांच्या सामानासाठी सुमारे 40 मिनिटे थांबावे लागले. एअर इंडियाच्या या व्यवहारामुळे मनोज जोशी यांनी ट्वीट करत आपली नाराजगी व्यक्त केली आहे.

मनोज जोशी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या  व्हिडीओद्वारे त्यांनी भोपाळची फ्लाइट तीन तासांच्या विलंबाने मुंबईत पोहोचल्याचे सांगितले. तसेच, मुंबईत पोहोचल्यानंतर जोशी यांना त्यांचे सामान घेण्यासाठी 40 मिनिटे वाट पाहावी लागली. तसेच,  एअर इंडियाचा कोणताही कर्मचारी तेथे मदतीसाठी नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या वेळेचा हा अपव्यय असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. त्यांनी एअर इंडियाला सांगितले की, मला फक्त माफी नको तर त्यावर उपायही हवा आहे, एअर इंडिया सुधारणार आहे की नाही, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

अभिनेते मनोज जोशी यांचे ट्वीट

आपल्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर करताना मनोज जोशी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘एअर इंडियाची फ्लाइट 634 तीन तास उशिराने होती. त्यात मी गेल्या 40 मिनिटांपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सामान येण्याची वाट पाहत आहे. मार्गदर्शन किंवा मदतीसाठी येथे एअर इंडियाचा एकही कर्मचारी नाही. मला आजपर्यंत इतकी वाईट सेवा मिळाली नाही. माझा आजचा संपूर्ण दिवस वाया गेला. माझे हे  नुकसान कोण भरून काढणार?’ असा सवालही त्यांनी एअर इंडियाला केला.

( हेही वाचा: देसाई, राऊतांनी चिठ्ठी दिली, तेव्हाच बाळासाहेबांविरोधातील खटला मागे घेतला; भुजबळांचा गौप्यस्फोट )

या ट्विटमध्ये त्यांनी एअर इंडियाला टॅग केले आहे. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना एअर इंडियाने लिहिले, ‘मनोज जोशी, आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमची बॅग आता मिळाली असेल. कृपया खात्री बाळगा की तुमचा प्रतिसाद आवश्यक पुनरावलोकनासाठी विमानतळ टीमकडे पाठवला गेला आहे. पुढच्या वेळी तुम्ही आमच्यासोबत उड्डाण कराल तेव्हा तुमची अधिक चांगली सेवा केली जाईल, असे ट्वीट एअर इंडियाने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.