बॉलिवूडचे हिरो हे आपल्या आयुष्यातील हिरो असता कामा नये तर ज्या महान व्यक्तींनी आपल्या देशासाठी सर्वस्व त्याग केले असे छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे हे आपल्या जीवनामध्ये आदर्श असले पाहिजेत, असे प्रतिपादन समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केले.
भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा आणि डहाणूकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत डहाणूकर महाविद्यालय विलेपार्ले येथील विद्यार्थ्यांकरिता सुप्रसिद्ध आयआरएस अधिकार समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानामध्ये समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आणि अंमली पदार्थापासून स्वतःचे संरक्षण करणे त्याचप्रमाणे समाजात देखील त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत माहिती दिली. त्यांनी हाताळलेल्या केसेसबद्दल देखील थोडक्यात माहिती दिली. विशेषत: बॉलिवूड संबंधातील केसेसबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती, त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला देखील समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी समर्पक उत्तरे दिली.
(हेही वाचा Calcutta High Court ने संघाच्या सभेला दिली परवानगी; राज्य सरकारने केलेला विरोध)
भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा तसेच डहाणूकर महाविद्यालय या दोन्ही संस्थांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा याप्रसंगी सत्कार केला. या कार्यक्रमासाठी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे ट्रस्टी दिलीप पेठे आणि डहाणूकर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विनय भोळे हे जातीने उपस्थित होते. भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचे सचिव संदीप पारीक, सह सचिव ललित छेडा आणि कोषाध्यक्ष प्रशांत गंगवाल हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. प्रतिमा गायतोंडे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण वंदे मातरम गीत सादर केले. भारत विकास परिषद ही अराजकीय सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेच्या संपूर्ण भारतामध्ये 1600 पेक्षा जास्त शाखा आहेत, त्यापैकी विलेपार्ले ही एक शाखा आहे. या शाखेमार्फत सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. सध्या समाजामध्ये अमली पदार्थाचा जो विळखा वाढत चालला आहे ते लक्षात घेता जनजागृती आणि विशेषता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून एक विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. (Sameer Wankhede)
Join Our WhatsApp Community