बॉलिवूड अभिनेता एजाज खानला एनसीबीकडून अटक! आठ तास चौकशी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई विमानतळावरुन मंगळवारी बॉलिवूड अभिनेता एजाज खान याला रात्री उशिरा अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या शादाब बटाटा आणि शाहरुख बुलेट यांच्या चौकशीत एजाज खान याचा त्यांच्याशी थेट संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बटाटाच्या चौकशीत एजाजचे नाव

काही दिवसांपूर्वी एनसीबीने पश्चिम उपनगरातून ड्रग्स माफिया फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा आणि त्याचा मित्र शाहरुख बुलेट या दोघांना अंमली पदार्थांसह अटक केली होती. हे दोघे बॉलिवूड, रेव्ह पार्टी, मुंबईतील पब्समध्ये ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचे चौकशीत समोर आले होते. तसेच शादाब बटाटा यांच्या संपर्कात बॉलिवूड मधील अनेक बडी हस्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान एनसीबीने या दोघांकडे कसून चौकशी केली असता बॉलिवूड अभिनेता एजाज खान याचे नाव समोर आले.

(हेही वाचाः ठरले! अखेर ‘हे’ करणार परमवीर सिंगांच्या आरोपांची चौकशी! )

एजाजची आठ तास चौकशी

एनसीबीने मंगळवारी एजाज खान राजस्थान येथून विमानाने मुंबईत येताच त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला घेऊन एनसीबीने अंधेरी, लोखंडवालासह एनसीबीने अनेक परिसरात छापेमारी देखील केली. त्याला सायंकाळी एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत एजाज खान याचे थेट संबंध शादाब बटाटा याच्याशी असल्याचे समोर आल्यामुळे, रात्री उशिरा एजाज खान याला अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणात शादाब बटाटाचे वडील आणि ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचे नाव पुढे आले असून, मंगळवारी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे आठ तास चौकशी करण्यात आली आहे.

अशी आहे बटाटाची संपत्ती

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, फारुख बटाटा हा शादाबने ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेले पैसे वेगवेगळ्या धंद्यात गुंतवत होता. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फारुख बटाटा याच्याकडे अनेक लक्झरी मोटारी आहेत, त्यात जॅग्वार कार, बीएमडब्लू, मर्सडीज या गाड्यांचा समावेश आहे. तसेच अंधेरी लोखंडवाला आणि मीरा रोड या ठिकाणी त्याचे ४ फ्लॅट असून ही सर्व संपत्ती ड्रग्सच्या काळ्या कमाईतून कमावली असल्याचा संशय एनसीबीला आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here