गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी म्हणून घोषित केलेल्या रियाझ भाटीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. किल्ला न्यायालयाने भाटी याचा फरार घोषित केलेला आदेश रद्द करण्यात आला आहे.
गोरेगाव येथील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी, विनय सिंह, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेसह ६ जणांविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपविण्यात आले होते. गुन्हे शाखेने या प्रकरणात सचिन वाझेसह तिघांना अटक केली होती, मात्र परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह हे मिळत नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर या तिघांना किल्ला न्यायालयाने फरार घोषित केले होते.
(हेही वाचा पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी ‘भाजप’चं देवाला साकडं!)
अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी भाटीचा मार्ग मोकळा
दरम्यान परमबीर सिंग आणि विनय सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश रद्द करून घेतला होता. रियाज भाटी याने फरार आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी (आज) त्याच्या अर्जावर सुनावणी करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयाने रियाज भाटी याच्या विरोधात दंडाधिकारी यांनी फरार घोषित केल्याचा आदेश रद्द केला आहे. रियाज भाटी याला मोठा दिलासा मिळाला असून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी भाटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Join Our WhatsApp Community