मोबाइल दिला नाही म्हणून शाळकरी मुलाने आयुष्य संपवलं; पालक म्हणून आपण कुठे कमी पडतोय?

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यात मोबाईल भेट दिला नाही म्हणून एका शाळकरी मुलाने आपल्या घराची दुर्दशा केली होती. कदाचित तो व्हिडिओ भारतातला नसावा. तरी एवढी लहान मुलं अशी का वागतात, हा प्रश्न आहे. आता बारामतीची एक बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. एक बाप म्हणून विचारांचं चक्र गरागरा फिरु लागलं.

( हेही वाचा : माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावणार! रेल्वेकडून दुरूस्तीची कामे पूर्ण, चाचणी सुरू )

बातमी अशी होती की, आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बारामती तालुक्यातील कर्‍हावागज गावातील आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव शुभम मोतीराम धोत्रे असून अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये हा मुलगा शिकत होता. खरंतर शुभमचे वडिल वारले आहेत आणि त्याची आई मोलमजूरी करुन घर चालवते.

यामुळे घरची परिस्थिती बेताचीच म्हणावी लागेल. शुभम गेल्या काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईलची मागणी करत होता. पण गरीबी असल्याने ती माऊली मोबाईल कुठून विकत घेऊन देणार? या मोबाईलवरुन माय-लेकामध्ये वाद व्हायचे. आईने मोबाईल न घेऊन दिल्यामुळे शुभम निराश झाला आणि त्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

९ वी मधला विद्यार्थी म्हणजे अवघं १४-१५ वर्षांचं वय. अजून त्याने जगही पाहिलं नव्हतं. इतक्या लहान वयात इतक्या लहान कारणामुळे त्याने आत्महत्या केली. सध्या आत्महत्येचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यात अल्पवयीन आणि तरुण मुलं आघाडीवर आहेत. ही मुलं क्षुल्लक कारणावरुन एवढा टोकाचा निर्णय घेतात. कदाचित यामागे कुटुंबातील तणावाचं वातावरण हाच एक मुद्दा असू शकतो.

पण आता आपण पालक म्हणून कुठे कमी पडतोय याचा विचार करायला हवा. आपण आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवत असल्याने त्यांना त्या गोष्टीची किंमत कळत नाही का? पण शुभमच्या बाबतीत तर तो गरीब होता, त्याचे हट्ट पुरवण्यासाठी त्याच्या आईकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. मग त्याला निराशा का आली असेल? कदाचित इतरांकडे खूप काही आहे पण आपल्याकडे काहीच नाही हे निराशेचं कारण असेल का? मग गरीब कुटुंबात जन्माला येऊन कष्ट करुन श्रीमंत झालेल्या मुलांचा आदर्श यांच्या समोर का नव्हता?

स्वा. सावरकरांचं सबंध जीवन आव्हानांनी, संकटांनी भरलेलं होतं. तरी ते दीर्घायुषी झाले. मग आपण सावरकरांचा आदर्श मुलांना का देत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तर आभाळाएवढी आव्हाने होती. पण त्यांनी स्वराज्य निर्माण करुन दाखवलंच ना? मग त्यांचा आदर्श आपन मुलांना का देत नाही? पालक म्हणून आपल्याला खरंच विचार करायची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here