मुख्यमंत्री साहेब प्यायचेही झाले ‘वांदे’! आता झिंगणेही झाले ‘महाग’…

‘दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा’…. हे आमचं मत नाही… हे काही महिन्यांपूर्वी फेमस झालेलं एक गाणं आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर डळमळीत झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला दारुच्या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे स्वतःला सोमरस प्राशन केल्यावर दोन पायांवर ताठ उभं राहता येत नसलं, तरी मद्यपींची कॉलर मात्र या काळात ताठ झाली होती. दारू पितो म्हणून कायम टीकेचे धनी होणा-या या मद्यपींना, एक वेगळाच अभिमान वाटू लागला होता. याबाबतीत अनेक विनोदी पोस्टसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. स्वतः (गटारात) पडत पडत का होईना, या मद्यपींनी अर्थव्यवस्था सावरली(उभी केली) होती.

पण आता राज्यभरात दारुच्या किंमती वाढल्या आहेत. ही दारुची ‘चढलेली’ किंमत पाहून, मद्यपींची पार ‘उतरुन’ गेली आहे. जसा सूर्य मावळला, की आपला लिव्हर खवळला, असं म्हणणा-या या मद्यपींना आता आम्ही रिचवायची कशी? असा प्रश्न पडला आहे. आम्ही अर्थव्यवस्था कशी सावरायची? मुख्यमंत्री साहेब आता आमचे प्यायचे वांदे झाले, अशी तक्रार या मद्यपींनी आता करायला सुरुवात केली आहे.     

(हेही वाचाः आधीच वेतनाची बोंब आता ​लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित)

आता काय परवडत नाय…

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्य सरकारने काही कठोर निर्बंध घातले आहेत. यामध्ये बार, वाईन शॉप्स देखील बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बार आणि वाईन्स शॉप्स बंद असल्याने मद्यपींचे पुरते हाल झाले आहेत. जी दारू वाईन शॉपमध्ये 170 ते 200 रुपयाला मिळत होती, त्यासाठी आता मद्यपींना 400 ते 500 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे या नव्या निर्बंधांमुळे आता आपल्याला काय परवडत नाय… अशी भावना काहींनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना व्यक्त केली आहे. आधी जी कॉटर 130 ला मिळत होती, ती आता 300 रुपयांना काही जण विकत आहेत. काही बार मालक तर पार्सल सेवा देताना देखील अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीही दारुचा काळा बाजार

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, अनेकांनी दारुचे अव्वाच्या सव्वा दर आकारले. काहींनी तर यावेळी एक बिअर तब्बल 600 रुपयांना विकली. तर काहींनी दारुच्या एका खंब्यामागे 2000 ते 2500 रुपये कमावले. आता देखील राज्यात असेच चित्र पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी बार आणि वाईन शॉप्स बंद असले, तरी पार्सलच्या नवाखाली काही जण लूटमार करत असल्याचे चित्र आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नालासोपारा या भागात तर हे प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत. याबाबत काही बार मालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आमचेही पोट आहे, मागील वर्षभर बार बंद होते आता पुन्हा तीच परिस्थिती. त्यामुळे थोडीफार जास्त किंमत घेऊन आम्ही पार्सल देतो, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

(हेही वाचाः आता कोरोना लस उत्पादन करणारी हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तरी काय? वाचा… )

दारूसाठी इतके मोजावे लागतात पैसे

बिअर- 400 ते 450 (ब्रँड नुसार किंमत वाढते)

ओल्ड मंक- 300 रुपये कॉटर, एक लिटर खंबा- 1500

रॉयल स्टॅग- 450 रुपये कॉटर

ब्लेंडर- 600 ते 650 कॉटर

अँटी क्युटी- 2500 ते 3000 खंबा

सिग्नेचर- 2500 ते 2700 खंबा

उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी बिअरची

उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक मागणी ही बिअरची असते. मात्र 175 ते 250 पर्यंत मिळणाऱ्या बिअरसाठी 400 ते 450 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या वर्षी देखील उन्हाळ्यातच टाळेबंदी लागल्याने बिअरच्या मागणीत मोठी घट झाली होती. आता देखील जरी पार्सल बिअर मिळत असली, तरी देखील याची किंमत बघूनच बिअरकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत.

गेल्या वर्षी उडाली वाईन्स शॉप बाहेर गर्दी

गेल्या वर्षी जेव्हा राज्य सरकारने वाईन शॉप्स उघडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा वाईन शॉपच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्याचे पहायला मिळत होते. काहींनी तर पुन्हा लॉकडाऊन लागेल या भीतीने वाईन शॉप उघडताच एक्सट्रा स्टॉक घेतला होता. आता देखील राज्यातील वाईन शॉप आणि बिअर बार बंद असल्याने, जर अचानक वाईन शॉप उघडे केले तर गेल्या वर्षीसारखी परिस्थिती दिसेल यात शंका नाही.

(हेही वाचाः ब्रेक दि चेन: लोकल ट्रेनने प्रवास करता येईल का? निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर…)


मला रोज एक कॉटर लागते. पण आता बार आणि वाईन शॉप बंद असल्याने ज्या किंमतीत कॉटर विकली जाते ती परवडणारी नाही. मी ओल्ड मंकची कॉटर 130 रुपयाला वाईन शॉपमध्ये घ्यायचो, त्यासाठी आता मला 300 रुपये मोजावे लागणार आहेत.

-प्रवीण, ग्राहक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here