इतिहासाची मोडतोड करणे हा राष्ट्रद्रोह!

रोज वेगवेगळ्या विषयावर आपल्याकडे वादावादी चाललेली असते. इतिहासाची मोडतोड करून चुकीचा, खोटा इतिहास पसरवणे हे कार्य अनंत दशके चालू आहे. रोज त्यात भर पडते. खरा इतिहास शिकवला गेला नाही. खोटा इतिहास सातत्याने पिढ्यांपिढ्या सांगितला गेला. त्यामुळे एखाद्याने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर ते सत्य असत्य आहे असेच सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. सर्वसामान्य माणसाला खरा इतिहास कोणता? खोटा इतिहास कोणता? हे कळतच नाही. त्यामुळे समाजाचा मोठ्या प्रमाणात वैचारीक गोंधळ उडतो आहे. वास्तविक आपण सारे या देशाचे नागरिक आहोत. आपणच आपल्या देशाचा इतिहास विकृत करून आपल्याच लोकांना सांगणे हा राष्ट्रद्रोह मानला पाहिजे. पण दुर्दैवाने तसे कायदेशीररित्या घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे कोणीही उठतो आणि इतिहासाची मोडतोड करून तो समाजासमोर आणतो.

…यात देशाची हानी

पुराव्यांसह सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते स्वीकारण्यासाठी असणारी शुद्धबुद्धी इतिहासाची मोडतोड करणाऱ्या लोकांमध्ये नाही. दुर्दैवाने इतिहासाची मोडतोड करणाऱ्या लोकांची संख्या या देशात जास्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वृत्तपत्र वाहिन्यांनासुद्धा सत्य जाणून घ्यायचे नाही. त्यामुळे ज्यांचा खरोखरच इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे आणि इतिहासात घडलेल्या सत्य घटना सप्रमाण सांगण्याची इच्छा आहे ते अशा गदारोळात सहभाग घेत नाहीत. कारण अनेक वेळा त्यांचे सत्यकथन दडपले जाते. चर्चेच्या वेळी विषय भरकटून दुसरीकडेच नेला जातो. या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना क्लेशकारक वाटतात. या सर्वातून निष्पन्न काही होत नाही. त्यामुळे वर्षोनुवर्षे ही गोंधळाची परिस्थिती तशीच कायम राहते. यात देशाची हानी आहे.

ही आपल्या देशाची शोकांतिका

ज्या देशाचा इतिहास विकृत स्वरूपात लोकांच्या माथ्यावर मारला जातो त्या देशाची तेजस्वी असलेली ऐतिहासिक परंपरा नष्ट होते. न्याय्यनिष्ठा, नैतिकता, प्रामाणिकता, सत्यनिष्ठा अशा सर्वोच्च सद्गुणांचा जेव्हा अभाव असतो त्यावेळी सत्य ओशाळून कोपऱ्यात उभे राहते. आज तीच अवस्था आहे. पण याविषयी अनेकांना ना खेद ना खंत! परकीय आक्रमकांचे गोडवे गाणे. त्यांचे क्रौर्य दडपून. त्याऐवजी अशा क्रूरकर्म्यांना सभ्य, मानवतावादाचे पुतळे म्हणून गौरवण्यात येते. आपला देश, आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास, याविषयी यथार्थ अभिमान बाळगण्या ऐवजी तो विकृत करण्यातच आनंद मानणारे लोक खरे राष्ट्रद्रोही आहेत. कारण ज्यांनी मनगटाच्या बळावर शौर्य गाजवून परकीय आक्रमकांना परास्त केले आणि आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा याचे रक्षण केले. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव व्यक्त न करता त्यांना इतिहासाच्या पृष्ठावरून काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्याविषयी अत्यंत त्रोटक माहिती पोहोचवण्यात आली. अशी बौद्धिक फसवणूक करण्याचे काम हे रानटीपणाचे लक्षण आहे, असे कोणाला वाटत नाही. हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे.

तेजस्वी परंपरेला असत्याच्या गर्तेत टाकण्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह

शाळेच्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आपल्याला काय सांगते याचाच विसर आता पडला आहे. या देशाच्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न करेन आपल्या देशाची परंपरा ही परकीय आक्रमकांची परंपरा नाही. आपल्या देशाची परंपरा क्रौर्याची नसून शौर्याची आहे. सत्यासाठी प्राण देणाऱ्या सत्यनिष्ठांची परंपरा आहे. अन्यायाविरुद्ध लढून न्याय प्रस्थापित करणाऱ्या न्यायनिष्ठांची परंपरा आहे. आततायी लोकांना कंठस्नान घालून सर्वसामान्य जनतेला सुखाने जगता यावे असे वातावरण निर्माण करणाऱ्या शीलवान राज्यकर्त्यांची परंपरा आहे. राक्षसी प्रवृत्तीला नष्ट करून सात्विकतेचे अधिष्ठान निर्माण करण्यासाठी शस्त्राचार करणाऱ्या वीर योद्ध्यांची परंपरा आहे. परधर्म सहिष्णुता याचा अर्थ स्वधर्माबद्दल अनास्था बाळगणे असा होत नाही हे सांगणाऱ्या विद्वतजनांची ही परंपरा आहे. या तेजस्वी परंपरेला असत्याच्या गर्तेत गाडून टाकण्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रद्रोह मानला पाहिजे. तरच या कपटी, कारस्थानी कृत्यांना आळा बसेल. आपल्या देशाची सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा अबाधित राहील. त्यासाठी तरी इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून कठोर शासन करणे नितांत आवश्यक आहे.

– दुर्गेश जयवंत परुळकर (व्याख्याते आणि लेखक)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here