९०च्या दशकात अनेक गुंड टोळ्यांचे मुंबईवर वर्चस्व होते. दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अश्विन नाईक या टोळ्यांतून अनेक लहान-मोठ्या टोळ्या तयार झाल्या. त्यापैकी एक टोळी म्हणजे ‘पांडवपुत्र’. मुंबईच्या गिरगांवातील कुंभारवाड्यातून उगम झालेल्या पांडवपुत्र टोळीला अरुण गवळीने पाठबळ दिल्यामुळे ही टोळी कुप्रसिद्धीच्या झोतात आली. या टोळीमागे मोठा इतिहास आहे. मुळात या टोळीचे नाव ‘पांडवपुत्र’ असे का पडले, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे.
(हेही वाचाः चोरीला गेलेला तुमचा मोबाईल कोण वापरतं माहीत आहे?)
अशी आहे पांडवपुत्र टोळी
पांडवपुत्र टोळीचे वर्चस्व केवळ दक्षिण मुंबईतील गिरगांवात टिकून राहिले आणि आजही ही टोळी दक्षिण मुंबई पुरती कार्यरत आहे. या टोळीच्या निशाण्यावर केवळ गिरगांव, कुंभारवाडा, खेतवाडी येथील मेटल व्यापारी, ट्रान्सपोर्ट कंपन्या आणि छोटे-मोठे इस्टेट एजंट राहिले आहेत. आजही येथील व्यापारी, दुकानदार आपल्या कमाईतील काही हिस्सा या टोळीच्या नावाने बाजूला काढून ठेवतात. येथील इस्टेट एजंट घर विक्री अथवा खरेदी करताना या टोळीचे कमिशन जोडूनच दलाली घेतात आणि पांडवपुत्र टोळीचे कमिशन या टोळीपर्यंत पोहचवले जाते. गिरगांव, खेतवाडी, कुंभारवाडा या परिसरात असणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या, तसेच मेटल व्यापारासाठी येणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहने पार्क करण्यासाठी पांडवपुत्र टोळीला मोठी रक्कम द्यावी लागते. या टोळीशिवाय याठिकाणी मोठी वाहने कोणी पार्क करुच शकत नाही, अशी व्यवस्था या टोळीने केली आहे.
(हेही वाचाः तुमच्या खिशातून मोबाईल होऊ शकतो चोरी! कसा तो वाचा?)
कोण आहेत पांडूपुत्र?
गिरगांवातील कुंभारवाडा येथे पांडुरंग वळेकर नावाचे गृहस्थ राहत होते. गरीब कुटुंबातील पांडुरंग यांना पाच मुले होती. पांडुरंग हे कुंभारवाड्यात ‘पांडू’ या नावाने प्रसिद्ध होते. एका पाठोपाठ पाच मुले झाल्यावर या मुलांना पांडूपुत्र (पांडुची मुले) म्हणून ओळखू लागले होते. मोठा मुलगा राजेश दुसरा दीपक, तिसरा राकेश, चौथा सचिन आणि पाचवा संदीप अशी पांडूला पाच मुले होती.
असा झाला टोळीचा जन्म
९० च्या दशकात मुंबईत अरुण गवळी गँगचे वर्चस्व होते. मराठी टोळी म्हणून अरुण गवळीची टोळी नावाजलेली होती. १९९२ मध्ये पांडुरंग वळेकर याची गिरगावात हत्या झाली होती. या हत्येमुळे पांडुरंग यांचा दोन नंबरचा मुलगा दीपक सुडाने पेटला होता व त्याला वडिलांच्या मारेकऱ्याचा सूड घ्यायचा होता. दीपकने वडिलांचा सूड घेण्यासाठी अरुण गवळीची मदत घेतली आणि वडिलांच्या मारेकऱ्याला संपवले, आणि खऱ्या अर्थाने पांडवपुत्र टोळीचा जन्म झाला.
(हेही वाचाः हॉटेलातील डीलक्स रूममध्ये ‘तो’ ८ महिने राहिला, बिल मागितले आणि…)
पांडवपुत्र टोळीची दहशत
पांडुचा दोन नंबरचा मुलगा दीपक हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला असला, तरी इतर भावंडे मात्र गुन्हेगारीपासून अलिप्त राहिली. वडिलांच्या मारेकऱ्यांना संपवल्यानंतर दीपकला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर दिपकची गिरगांव परिसरात दहशत वाढली आणि त्याने परिसरातून मेटल व्यापारी, ट्रान्सपोर्टर यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. पांडुपुत्र म्हणून दिपकची ओळख कुंभारवाडा आणि गिरगांवात होऊ लागली. दीपकला पांडू पुत्र नावाने परिसरात ओळखू लागले. हळूहळू दिपकने त्याच परिसरातील मराठी मुलांना घेऊन टोळी तयार केली आणि त्या टोळीला “पांडवपुत्र’ टोळी असे नाव पडले. मात्र या पांडवपुत्र टोळीशी पांडुच्या इतर चार मुलांचा काही संबंध नसल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
Join Our WhatsApp Community