आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणारे एनडीआरएफ आहे तरी काय?

देशभरात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करणारे एनडीआरएफ म्हणजे नेमके आहे तरी काय?

91

तुफान पावसामुळे आलेल्या पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. यामध्ये पूरासोबतच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुर्घटनाग्रस्त लोकांचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या बचावकार्यात आघाडीवर आहेत ते म्हणजे एनडीआरएफचे जवान. तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एनडीआरएफचे पथक उशिरा पोहोचल्याचे बोलले जात असले, तरी आपत्तीच्या काळात एनडीआरएफचे जवान दिवस-रात्र झटत असतात. देशभरात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्य करणारे एनडीआरएफ म्हणजे नेमके आहे तरी काय?

पूर, भूकंप, वादळ, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी एनडीआरएफकडून ताबडतोब मदत आणि बचावकार्य केले जाते.

कशी झाली सुरुवात?

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता युकोहामा स्ट्रॅटेजी योजना(1994) आणि ह्योगो फ्रेमवर्क फॉर अॅक्शन(2005)चा संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकार केला. त्याचवेळी 1999 साली आलेले ओडिशातील वादळ, 2001 चा गुजरातमधील भूकंप आणि 2004 साली आलेल्या त्सुनामीचे तांडव या नैसर्गिक आपत्तींचा भारतालाही सामना करावा लागला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन योजनेची व्यापक गरज लक्षात घेऊन, केंद्र सरकारकडून 26 डिसेंबर 2005 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाची धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)ची स्थापना केली गेली.

(हेही वाचाः कोकणात बचावकार्यामध्ये दिरंगाई, न्यायिक चौकशी करा! अतुल भातखळकरांची मागणी)

असे आहे मनुष्यबळ

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ)ची स्थापना करण्यात आली. 2006 साली एनडीआरएफच्या 8 तुकड्या तयार करण्यात आल्या. सध्या या तुकड्यांची संख्या 12 इतकी झाली असून, त्यात एकूण 1 हजार 149 जवान काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सुद्धा या जवानांवर देण्यात आली होती. पण आपत्कालीन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज असल्याने 2008 पासून एनडीआरएफ हे केवळ आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत आहे.

आजवर एनडीआरएफकडून देशातील अनेक राज्यांत आपत्ती काळात बचावकार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातही अनेक लहान-मोठ्या दुर्घटनांमध्ये एनडीआरएफने आपली कामगिरी बजावली आहे.

(हेही वाचाः महाडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य)

एनडीआरएफने महाराष्ट्रात आजवर केलेली बचावकार्ये

  1. डोंबिवलीतील आचार्य केमिकल कंपनीत 26 मे 2016 रोजी सिलेंडरचा स्फोट झाला. त्यावेळी दोन दिवस एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
  2. मुंबई-गोवा महामार्गावरील महाड ते पोलादपूरच्या दरम्यान असणारा सावित्री नदीवरील पूल 2 ऑगस्ट 2016 रोजी मुसळधार पावसामुळे कोसळला. यावेळी एनडीआरएफ आणि नौदलाकडून संयुक्त बचावकार्य करण्यात आले. त्यावेळी 117 जणांना वाचवण्यात यश आले.
  3. 2019 मध्ये डोंगरीतील केसरबाई बिल्डिंग कोसळली. त्यावेळी ढिगा-याखाली अडकलेल्या 6 लोकांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आले, तर 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
  4. 24 ऑगस्ट 2020 रोजी महाड येथे बिल्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी दोन दिवस झालेल्या बचावकार्यात एनडीआरएफने एकूण 15 मृतदेह बाहेर काढले, तर दोन जणांना वाचवण्यात त्यांना यश आले.
  5. 21 सप्टेंबर 2020 रोजी भिवंडी येथे गिलानी बिल्डिंग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एनडीआरएफच्या जवानांनी मोलाची कामगिरी बजावली. तीन दिवस करण्यात आलेल्या बचावकार्यात एनडीआरएफने 9 जणांना सुखरुप बाहेर काढले, तर एकूण 31 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी तब्बल 35 लाख रुपयांची रोख रक्कम सुद्धा एनडीआरएफने शोधून दिली.
  6. सध्या महाराष्ट्रातली पूरपरिस्थिती आणि तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुद्धा एनडीआरएफच्या 34 तुकड्यांनी बचावकार्य केले आहे. या बचावकार्यात एनडीआरएफने 1800 जणांना वाचवले असून, तब्बल 52 मृतदेह शोधून काढले आहेत.

(हेही वाचाः …म्हणून तळीये गावात बचावपथक वेळेत पोहचले नाही! मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण!)

इतर देशांनाही केली मदत

2011मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीच्या वेळी एनडीआरएफची तुकडी जपानमध्ये बचावकार्य करण्यासाठी गेली होती. तब्बल 10 दिवस त्यांनी बचावकार्य केले. यावेळी बचावासोबतच एनडीआरएफने तब्बल 50 दशलक्ष येन पेक्षा जास्त रोख रक्कम शोधून जपानकडे सुपूर्द केली. या कार्याबद्दल जपानच्या तत्कालीन पंतप्रधानांनी भारताचे व एनडीआरएफचे आभार मानले होते.

japan
भारताचा शेजारी असणा-या नेपाळमध्ये 2015 साली मोठा भूकंप झाला तेव्हा एनडीआरएफने आपल्या एकूण 16 तुकड्या तेथे पाठवल्या. यावेळीही मोठे बचावकार्य करण्यात आले.

(हेही वाचाः दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भीषण आग)

एनडीआरएफच्या संपूर्ण भारतात एकूण 12 तुकड्या आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे-

01 बटालियन, गुवाहटी(आसाम)

02 बटालियन, हरिंघटा(सिक्कीम)

03 बटालियन, मुंडाली(ओडिशा)

04 बटालियन, अरक्कोनाम(अंदमान व निकोबार)

05 बटालियन, पुणे(महाराष्ट्र)

NDRF

06 बटालियन, बडोदा(गुजरात)

07 बटालियन, भटिंडा(चंदीगढ)

08 बटालियन, गाझियाबाद(दिल्ली-हरियाणा)

09 बटालियन, पटना(बिहार)

10 बटालियन, विजयवाडा(आंध्र प्रदेश)

11 बटालियन, वाराणसी( उत्तर प्रदेश)

12 बटालियन, डोईमुख(आसाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.