स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांच्या दृष्टीने ज्ञानी-राष्ट्रभक्त क्रांतिकारक होते. सावरकरांसारखा बुद्धिमान क्रांतिकारक आपल्या साम्राज्याला मोठा धोका निर्माण करू शकतो, ही गोष्ट ब्रिटिश जाणून होते. म्हणूनच त्यांनी सावरकरांना कठोरात कठोर शिक्षा केली. त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यांना अमानुष वागणूक दिली. सावरकर सर्व क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा कणखर नेता असल्याचे लंडनमध्येच ब्रिटिशांनी जाणले होते.
( हेही वाचा : महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना जशासतसे उत्तर देऊ; फडणवीसांचा ‘मविआ’ला इशारा )
अशा सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांच्यातली लढाऊ वृत्ती मारून टाकण्याचा प्रयत्न हेतूतः ब्रिटिशांनी केला. त्यासाठी त्यांना कठोरातले कठोर शासन करण्यात आले. अंदमानला त्यांना महाराजा बोटीतून नेण्यात आले. त्यावेळी दरोडेखोर, खुनी असलेल्या कैद्यांच्या सहवासात त्यांना ठेवण्यात आले. हे कैदी जिथे मलमूत्र विसर्जन करत होते त्याच्या बाजूलाच सावरकरांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे मलमूत्र सावरकरांच्या तोंडावर उडेल याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. अशा गलिच्छ वातावरणात सावरकरांना ठेवल्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांची बुद्धी भ्रष्ट व्हावी हाच त्या मागचा हेतू होता. उच्चविद्याविभूषित, सज्जन माणसाला वारंवार अपमानित करून त्याचा मानसिक छळ केला जात होता. शारीरिक शिक्षा केली जात होती. या सर्व गोष्टींमुळे हा ज्ञानी-राष्ट्रभक्त क्रांतिकारक ढेपाळला पाहिजे. त्याने आत्महत्या केली पाहिजे. असा अमानुष शिक्षा करण्यामागचा ब्रिटिशांचा हेतू होता. सावरकरांचा अत्यंत छळ करून त्यांना जीवनापेक्षा मृत्यू जवळचा वाटावा असे वातावरण ब्रिटिशांनी निर्माण केले होते. तो हेतू ते साध्य करू शकले असते तर सावरकरांसारखा एक मोठा अडसर त्यांच्या मार्गातून कायमचा दूर झाला असता. आपल्या सुदैवाने आणि ब्रिटिशांच्या दुर्दैवाने तसे घडले नाही.
या सर्व गोष्टींचा मानसिक परिणाम सावरकरांच्या मनावर होत होता. त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार डोकावत होते. तथापि त्यांनी त्या अविचारांवर मात करून ब्रिटिश सरकारच्या या जाचाला यशस्वीपणे तोंड दिले. स्वतःचे मन खंबीर बनवले. नकारात्मक विचारांना हद्दपार केले. त्याचवेळी त्यांनी आपल्याबरोबरच्या इतर राजबंदिवानांना मानसिक आधार देऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
आपण त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणे म्हणजेच ब्रिटिशांना मदत केल्यासारखे आहे. असा विचार करून सावरकरांनी या नकारात्मक विचारांवर मात केली. सावरकरांच्या या विजिगीषु वृत्तीमुळे ब्रिटिशांचा हेतू सफल झाला नाही.
त्यांना देण्यात आलेली खड्या बेडीची शिक्षा, एकांतवासाची शिक्षा, त्यांना देण्यात आलेले कीडे, अळी, झुरळ, पाली युक्त निकृष्ट दर्जाचे अन्न हा त्या क्रूर शिक्षेचाच एक भाग होता. अखेरीस सावरकरांची १४ वर्षांनंतर कारागृहातून मुक्तता झाली. पुढे तेरा वर्षांच्या स्थानबद्धतेच्या शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांना पूर्ण पन्नास वर्षांची शिक्षा भोगावी लागली असती तर २४ डिसेंबर १९६० मध्ये त्यांची मुक्तता झाली असती. पण त्याआधीच त्यांची मुक्तता झाली होती. त्यांनी जन्मठेपेच्या शिक्षेवर मात केली म्हणून त्यांचा मृत्युंजय वीर म्हणून देश बांधवांनी गौरव केला.
मृत्यूवर मात करून सावरकर पूर्ण आयुष्य जगले. ब्रिटिशांचा हेतू सफल होऊ दिला नाही. ब्रिटिशांवर मात करून आपल्या मायभूमीला त्यांनी स्वतंत्र केले. अशा या मृत्युंजय वीराला कोटी कोटी प्रणाम!
( लेखक व्याख्याते आहेत. )
संपर्क : ९८३३१०६८१२