तुटलेल्या संरक्षक भिंतीवरून तरुण मुलांनी गाठले नॅशनल पार्कचे बिबट्या अनाथालय

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त प्राण्यांसाठी असलेली संरक्षक भिंत तुटल्यामुळे पुन्हा आव्हान निर्माण झाले आहे. ३० ऑगस्टला पर्यटकांना प्रवेशबंदी असलेल्या बिबट्या अनाथालयापर्यंत दोन तरुण मुले पोहोचली होती. या मुलांनी उद्यानाला लागून असलेल्या ऋषीवन परिसराभोवती पडीक भिंतीतून जंगलातील बिबट्या अनाथालय भागात प्रवेश केला. तुटलेल्या भिंतीतून प्रवेश केल्याची कबुली दोन तरुण मुलांनीच वनाधिकाऱ्यांच्या चौकशीत दिली. या घटनेनंतर उद्यान प्रशासनाने तुटलेली संरक्षक भिंत कधी उभारणार याची माहिती दिली नाही. ही माहिती घेण्यासाठी वारंवार मुख्य वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जुन यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

( हेही वाचा : 18 सप्टेंबरपासून मुंबईत पोलिओ लसीकरण मोहीम )

काय आहे प्रकरण?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर मॅप्को फॅक्टरी नावाने ओळखल्या जाणा-या भागांत उद्यानातील पिंज-यांत बंदिस्त असे बिबट्यांचे अनाथालय आहे. या भागांत पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. बोरिवली पूर्वेतच राहणा-या काजूपाडा येथील यश पांचाळ आणि नवाब पठाण या मुलांनी वनाधिका-यांची नजर चुकवून या निषिद्ध भागांत प्रवेश केला. बिबट्या अनाथालयाला लागून असलेल्या भिंतीवर चढून एकाने मोबाईलवर पिंज-यातील बिबट्याचा व्हिडिओ रॅकोर्ड केला. ३० ऑगस्ट रोजी दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला.

समज देऊन आर्थिक भुर्दंडाची शिक्षा

दोन्ही तरुण मुले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहेत. बिबट्या अनाथालयाच्या भिंतीवर चढून पिंजऱ्यातील बिबट्याचा व्हिडीओ काढला गेला. मात्र प्राण्याला कोणतीही इजा केली नाही. ही बाब लक्षात घेत दोघांकडून केवळ दोन हजार रुपये आर्थिक दंड स्वरूपात उद्यान प्रशासन वसूल करणार आहे.

तुटलेल्या संरक्षक भिंतीपासून 100 मीटर अंतरावर वाघ सफारी

ऋषीवनाला लागूनच उद्यानातील व्याघ्र सफारीच्या पिंजऱ्याचा भाग आहे. या तुटलेल्या भागातून ऋषीवन आणि काजूपाडा या भागातील माणसे सर्रास उद्यानातील नद्यामध्ये पोहायला जातात. याआधी सफारीचे पिंजरेही अज्ञात माणसांनी तोडले होते. सध्या बांधकामानिमित्ताने व्याघ्र सफारीचा भाग बंद आहे. परंतु याच मार्गातून जंगलाच्या वाटेने दोन मुले बिबट्या अनाथालयाच्या भिंतीपर्यंत पोहोचली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here